
मुंबई : मुंबईमध्ये सण, उत्सवांचा हंगाम सुरु झाला आहे . या पार्श्वभूमीवर मुंबईतील पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सज्ज झाली आहे .
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सण, उत्सवांना सुरुवात झाली आहे . गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळीसारखे प्रमुख सण लवकरच सुरु होत आहे . १७ ऑगस्ट रोजी मुंबईत तब्बल ६० पेक्षा अधिक मोठ्या आणि महत्वाच्या मंडळांच्या गणपतींचे आगमन होणार आहे . २७ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे हा उत्सव १० दिवस चालणारा मुंबईतील सर्वांत मोठा आणि भव्य उत्सव आहे.या काळात मुंबईत लालबागसह अनेक परिसरात भाविक लाखोंच्या संख्येने गणपती पाहण्यासाठी येत असतात . तसेच विसर्जन काळात देखील मुंबईच्या चौपाट्यांवर मोठी गर्दी असते .
या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि उत्सव शांततेत पार पडावा . या पार्श्वभूमीवर मुंबईच्या पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीला डॉ. आरती सिंह, सत्यनारायण चौधरी, धनंजय कुलकर्णी उपस्थित होते. आयुक्तांनी स्पष्ट सूचना दिल्या की, उत्सवादरम्यान संपूर्ण शहरात पोलिसांची उपस्थिती स्पष्टपणे दिसून यावी. त्यांनी अधिका-यांना जनतेशी कडक पण सभ्य वृत्ती बाळगण्याचे आणि नागरिकांच्या तक्रारींकडे त्वरित लक्ष देण्याचे आदेश दिले. तसेच, उत्सवाच्या दरम्यान कार्यक्रमांना वेळेची मर्यादा आणि नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
मुंबईत पुढील आठवड्यापासून १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन आणि १६ ऑगस्टला दहीहंडी उत्सवाने उत्सवांचा हंगाम सुरू होईल. त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळीसारखे प्रमुख सण येतील. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे स्थानिक मंडळांना कठीण पडते आणि प्रसंगी अनुचित प्रकारांना त्यांना सामोरे जावे लागते . हे प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे . सार्वजनिक ठिकाणी, महत्त्वाच्या इमारतींमध्ये आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात येईल. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गुप्तचर यंत्रणा अधिक सक्रिय करण्यात आली आहे. महत्वाच्या आणि मनाच्या दहीहंडी ज्याठिकाणी असतील त्याठिकाणी बंदोबस्त मोठा असेल . गर्दीवर पोलिसांचे बारीक लक्ष असेल . ठिकठिकाणी नाकाबंदी सह चोख बंदोबस्त करण्याचे आदेश प्रशासनाकडून मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत .
मुंबईकरांनी सुरक्षित आणि उत्साही वातावरणात सणांचा आनंद घ्यावा हा आमचा उद्देश आहे. यासाठी पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. कोणत्याही संशयास्पद हालचालीची तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करा. असे निर्देश मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी दिले आहेत .