
रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथील गणेश मंदिर येत्या अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांसाठी १८ तास खुले ठेवले जाणार आहे. मंगळवार दि. १२ ऑगस्ट रोजी गणपतीपुळे मंदिरात अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे या यात्रोत्सवानिमित्त पहाटे साडेतीन ते रात्री साडेदहा अशा एकूण १८ तासांच्या कालावधीत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. सध्या अंगारिका चतुर्थी श्रावण महिन्यात आली असल्यामुळे अंगारकीमुळे गणपतीपुळे येथे घाटमाथ्यासह महाराष्ट्रातील अन्य ठिकाणाहून मोठी गर्दी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यात्रोत्सवाचे प्रशासनाने चोख नियोजन करून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत .
गणपतीपुळे देवस्थानच्या सभागृहात अंगारकीच्या नियोजनासाठी विशेष बैठक तहसीलदार राजाराम म्हात्रे व प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या उपस्थितीत झाली. यात्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शनाची व अन्य व्यवस्था अतिशय सुरळीतरीत्या उपलब्ध होण्यासाठी तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी गणपतीपुळे ग्रामपंचायत, देवस्थान समिती, पोलिस, महावितरण, आरोग्य विभाग, आरटीओ, एसटी महामंडळ, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, महसूल विभाग व अन्य सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासन आणि यंत्रणा सज्ज
गतवर्षीच्या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाला २५ हजार भविकांचा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र जवळपास ५० हजारांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती. यावर्षी ४० ते ५० हजार भविकांचा अंदाज वर्तवण्यात आला असून, ही संख्या दुप्पटीने वाढण्याची शक्यता असल्यामुळे, प्रशासन आणि यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
मंदिर आणि गणपतीपुळे परिसरात भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत नेटके नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वीजपुरवठा, पाणीव्यवस्था, पार्किंग व्यवस्था व अन्य सर्व प्रकारच्या सोयीसुविधा भाविकांना तत्पर मिळण्याच्यादृष्टीने ग्रामपंचायतीने कटाक्षाने लक्ष घालावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
गणपतीपुळे मंदिराचे मुख्य पुजारी अभिजित घनवटकर यांच्या हस्ते श्रींची पूजाअर्चा, मंत्रपुष्प व आरती झाल्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले होईल. पहाटे साडेतीन ते रात्री साडेदहा अशा एकूण १८ तासांच्या कालावधीत भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
खवळलेल्या समुद्राची सध्याची धोक्याची स्थिती लक्षात घेऊन येणाऱ्या भाविकांना सूचना मिळाव्यात यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायत आणि सर्व यंत्रणांच्या वतीने परिसरात माहितीफलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच किनारी विशेष गस्त घालण्यासाठी ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, देवस्थानच्या सुरक्षारक्षकांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या वेळी संस्थान श्री देव गणपतीपुळेचे सरपंच डॉ. श्रीराम केळकर, पंच अमित मेहेंदळे, विद्याधर शेंडे, गणपतीपुळे गावच्या सरपंच कल्पना पकये, जयगड पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, मुख्य पुजारी अभिजित घनवटकर, ग्रामपंचायत सदस्य राज देवरूखकर, ग्रामसेवक प्रवीण चौधरी, गणपतीपुळे पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवी, राहुल घोरपडे, भागवत, मालगुंड तलाठी कार्यालयाचे मंडल अधिकारी अरुण जाधव, तलाठी वीर, कोतवाल सुशील दुर्गवळी, मालगुंड आरोग्य विभागाचे नागवेकर व विविध खात्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.