
नवी दिल्ली: दिल्ली ग्राहक तक्रार निवारण आयोगाने इंडिगो एअरलाइन्सवर सेवेत कमतरता दाखवून प्रवाशाला अस्वच्छ व डाग पडलेली आसन व्यवस्था दिल्याप्रकरणी दीड लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच २५ हजार रुपये खटल्याचा खर्च म्हणून भरपाई देण्याचे निर्देशही एअरलाईनला देण्यात आले आहेत.
'पिंकी' नावाच्या महिला प्रवासीच्या तक्रारीनुसार, २ जानेवारी २०२५ रोजी त्या बाकू दिल्लीला येत असताना इंडिगोच्या विमानात त्यांना जी जागा दिली गेली ती अस्वच्छ, घाणेरडी व डाग पडलेली होती. या गोष्टीची तक्रार केल्यानंतरही, त्यांना एअरलाईन्सकडून उपेक्षा आणि असंवेदनशीलता अनुभवावी लागली, असा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता. यावर इंडिगो एअरलाइन्सने आपली बाजू मांडताना सांगितले की, त्यांनी प्रवाशाच्या तक्रारीची दखल घेतली आणि त्यांना दुसरी जागा देखील दिली.
आयोगाचा निष्कर्ष
न्यायमूर्ती पूनम चौधरी (अध्यक्ष) आणि सदस्य बारीक अहमद व शेखर चंद्र यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार, आयोगाने स्पष्टपणे म्हटले आहे की, “इंडिगो सेवा दोषी ठरत असून प्रवाशाला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. त्याला नुकसानभरपाई दिली पाहिजे. त्यामुळे दीड लाख रुपयांची भरपाई आणि २५ हजार रुपये वाद खर्च देण्याचे आदेश दिले आहेत.
विशेष म्हणजे, आयोगाने इंडिगोच्या बचावात आणखी एक त्रुटी दाखवून दिली. विमानसेवेतील एक महत्त्वाची नोंद असते, ज्यात प्रवासादरम्यान घडलेल्या घटना नोंदवल्या जातात. पण इंडिगोने ही नोंद आयोगासमोर सादर केली नाही. आयोगाने हे ‘संवेदनशील बाबींचा पुरावा नसल्यामुळे बचाव दुर्बल ठरतो’ असे नमूद केले.