कर्जत : कर्जत तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. या समस्येबाबत शनिवारी ‘कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समिती’च्या वतीने महावितरणला निवेदन देण्यात आले. यामध्ये मागील वर्षी केलेल्या आंदोलनातील काही मागण्या अद्याप पूर्ण न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच यावेळी वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा संघर्ष समितीच्या वतीने ॲड. कैलास मोरे यांनी दिला आहे.
तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात वारंवार वीज खंडित होत असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, हॉटेल व्यवसायिक, ऑनलाइन काम करणारे युवक, उद्योजक, फार्म हाऊस व्यावसायिक इत्यादींचे मोठे नुकसान होत आहे. विजेवरील उपकरणे खराब होत असून आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात
होत आहे.
त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळ तसेच घरोघरी सर्वाधिक वीज लागते, त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच विजेची कामे तत्काळ पूर्ण करावीत, तसेच या काळात २४ तास अखंड वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी संघर्ष समितीकडून करण्यात आली.