महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे
ह्मदेवाने आपल्या विविध अंगापासून ऋषींची (मानसपुत्रांची) उत्पत्ती केली. मनापासून मरीची, डोळ्यापासून स्त्री, मुखातून अंगीरा, कानापासून पुलस्य, नाभीपासून पूलह, हातापासून कृती, त्वचेपासून भृगु, प्राणापासून वशिष्ठ, अंगठ्यापासून दक्ष व मांडीपासून नारद असे दहा पुत्र उत्पन्न केले. यातील दक्षाला ६४ कन्या होत्या. त्यांचा विवाह ऋषी, मुनी, देवता, असुर, यांच्याशी लावून त्यांच्याद्वारे सृष्टीची निर्मिती व विस्तार झाला.
ब्रह्मदेवाच्या उजव्या स्तनापासून धर्म व धर्मातूनच स्वतः नारायण निर्माण झाले. पाठीपासून अधर्म व अधर्मापासून मृत्यूचा जन्म झाला. ब्रह्मदेवाच्या हृदयापासून काम, भुवयापासून क्रोध, खालच्या ओठापासून लोभ, मुखातून सरस्वती, लिंगापासून समुद्र, गुदस्थानापासून निऋती, (हे पापाचे निवासस्थान) निर्माण झाले.
सरस्वतीला पाहून ब्रह्मदेवांच्या मनात तिच्याबद्दल आसक्ती निर्माण झाली. तेव्हा मरीची आदी त्यांच्या ज्ञानी पुत्रांनी या अधर्मी विचारांपासून त्यांना परावृत्त केले. आपल्या मनात असे विचार आल्याबद्दल ब्रह्मदेव लज्जित झाले. त्यांनी तक्षणीच त्या अधर्मी शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण केले. त्यागलेल्या शरीराला दिशा घेऊन गेल्या. त्याचे धुके झाले. यालाच अंधार असेही म्हणतात.
ब्रह्मदेवाच्या चारही मुखातून वेद उत्पन्न झाले. पूर्वेकडील मुखातून ऋग्वेद, दक्षिण मुखातून यजुर्वेद, पश्चिम मुखातून सामवेद तर उत्तर मुखातून अथर्ववेदाची रचना केली. ब्रह्मदेवाने दुसरे शरीर धारण केल्यानंतर आपल्या विश्वविस्ताराच्या कार्याबद्दल पुन्हा विचार करू लागले. त्यांचे मानसपुत्र मरीचीकडून मनाप्रमाणे विस्तार न झाल्याचे पाहून ते चिंताग्रस्त झाले. आपल्या विस्ताराच्या प्रयत्नात दैव विघ्न आणत असावे असा विचार त्यांच्या मनात आला.
एकाएकी त्यांच्या शरीराचे दोन भाग झाले, त्यातून एक स्त्री पुरुषाची जोडी तयार झाली. पुरुष म्हणजेच स्वयंभूव मनू व ती स्त्री म्हणजे महाराणी शतरुपा. मनु व शतरूपाने ब्रह्मदेवांना आमच्यासाठी काय आज्ञा आहे अशी विचारणा केली. तेव्हा तुम्ही दोघे स्वतः सारखीच गुणवान प्रजा निर्माण करा असा आदेश दिला. तेव्हापासून मैथुनाद्वारे प्रज्योत्पादन होऊ लागले.
मनू व शतरूपाला पाच अपत्ये झाली. प्रियव्रत व उत्तानपाद(धृवाचे पिता) ही दोन मुले व आकृती, देवहूती व प्रसूती या तीन मुली. यापैकी आकृतीचा विवाह ऋषी रूचीशी, देवहूतीचा विवाह ऋषी कर्दमशी व प्रसूतीचा विवाह प्रजापती दक्षाशी झाला.
मनुने ब्रह्मदेवाला स्वतःसाठी व आपण निर्माण करणार असणाऱ्या प्रजेच्या राहण्यासाठी जागा कोणती असा प्रश्न केला. कारण त्यावेळी पृथ्वी प्रलयात बुडालेली होती. हिरण्याक्षाने ती समुद्र तळाशी नेली होती.
आकाशात तेव्हा ब्रह्मदेव विचारमग्न झाले असता त्यांच्या नाकातून अंगठ्याएवढा वराह शिशू बाहेर पडला व त्याने पाहता पाहता विशाल रूप धारण केले. ब्रह्मदेव व सर्व मुनींना आश्वासित करीत ते समुद्रात शिरले व हिरण्यक्षाचा वध करून रसातळातील पृथ्वीला वर आणले, ते पाहून सर्वजण भगवंताची स्तुती करू लागले. वराहरूपी भगवंतांनी पृथ्वी आपल्या दातावर आणली व आपल्या खुरांनी पाणी स्थिर करून त्यावर पृथ्वी ठेवून भगवंत अंतर्धान पावले. (उत्तरार्ध)