Saturday, August 9, 2025

पालकत्व आणि वैवाहिक आयुष्यातील समतोल

पालकत्व आणि वैवाहिक आयुष्यातील समतोल

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू


नवीन पालक होणे हा आनंद, प्रेम आणि नवीन अनुभवांनी भरलेला एक रोमांचक प्रवास असतो. हा काळ महत्त्वपूर्ण बदल आणि जुळवून घेण्याचादेखील असतो. बाळाचे आगमन, नवीन जबाबदाऱ्या, निद्रानाशाच्या रात्री आणि विविध प्रकारच्या भावना घेऊन येते. या सर्वांमध्ये, जोडप्यांना एकमेकांपासून विचलित होणे आणि एकमेकांपासून वेगळे होण्यापेक्षा एकमेकांना दोघांनीही समजून घेणे गरजेचे आहे. तरच संसाराचे नाते अधिक खुलत राहील हे या लेखामधून सांगण्यात आले आहे.


पालकत्व आणि वैवाहिक आयुष्य यात समतोल राखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. लग्नापूर्वी तसंच लग्नानंतरचं आयुष्य यात जसा फरक असतो, त्यापेक्षाही जास्त लग्नाचं आयुष्य आणि मूल झाल्यानंतरचं आयुष्य यात खूप फरक पडतो. सुरुवातीच्या काळात आपल्या प्रायोरिटीजवर आपण आणि आपला पार्टनर असतो. पण मूल झाल्यावर मुलांना महत्त्व, प्रायोरिटी द्यावी लागते. इच्छा असूनही एकमेकांना वेळ देता येत नाही.


वाईट वाटतं, कधीकधी असहाय होऊन एकटंही वाटतं. तारुण्यातील काही काळ हातातून निसटून चाललाय हा विचारही मनाला उदास करतो. मुलांवर प्रेम नसतं असं नाही तरीही जोडपं, कपल म्हणून आयुष्य उरत नाही. रोल बदललेले असतात. बायको आपल्याकडे दुर्लक्ष करते. संगोपनातच दंग असते अशा तक्रारीही सुरू होतात. खरं म्हणजे दोघंही एकमेकांना मिस करतात. एकमेकांना पूर्वीसारखा सहवास हवा असतो. यासाठीच पालकत्व आणि वैवाहिक आयुष्य यात समतोल साधावा लागतो.


पालकत्वाची जास्त जबाबदारी, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ हा बहुतेकवेळा स्त्रीला द्यावा लागतो. त्यामुळे ती थकून जाते. तिला घरकाम, स्वयंपाक, मुलांची तयारी आणि बऱ्याच गोष्टी समोर दिसत असतात. त्यामुळे सहवास, प्रेम, प्रणय या गोष्टी राहून जातात. दुरावा नकळत निर्माण होत जातो. म्हणूनच मुलांना वाढवणं आणि तुमचं वैवाहिक आयुष्य दोन्ही गोष्टी आनंदी राहाव्यात, तुमचं जीवन समाधानी आणि समृद्ध राहावं यासाठी काही गोष्टी ठरवून जाणीवपूर्वक करा.




  • १. मूल दोघांचं आहे. मुलांच्या वाढवण्याची जबाबदारी, त्याच्याशी संबंधित गोष्टी उदा. खाणंपिणं, झोप, खेळ, अभ्यास, छंद, आर्थिक खर्च हे दोघांनीही एकत्र बसून ठरवायला हवं. काही गोष्टी एकत्र करा.

  • २. महिन्यातून २-३ वेळा एकत्र हॉटेलिंग, शॉपिंग, ट्रिप्सना जात असाल तर एक दिवस फक्त तुमच्या दोघांचा असू दे.

  • ३. छोटे छोटे क्षण, प्रसंग असा दोघांचा क्वालिटी टाईम काढावा लागेल. उदा. एकत्र कॉफी घेणं, रात्रीचे एकत्र चालणे.

  • ४. एकमेकांशी मोकळेपणाने बोला. आपल्या मनातील इच्छा, गरजा, अपेक्षा मनातच ठेवू नका, घुसमट होऊ देऊ नका. नाहीतर मनात राग, निराशा, एकटेपणा साठत जाईल आणि तुमचं नातं यामुळे विस्कटत जाईल. म्हणूनच एकमेकांना न दुखावता, आदर राहील अशा रितीने बोला.

  • ५. मुलांच्या झोपण्याची वेळ ठरवणं आवश्यक आहे. अशा बाऊन्ड्रीज सेट केल्याने जोडप्याला स्वतःसाठी वेळ काढता येईल.

  • ६. जेव्हा गरज असेल तेव्हा कुटुंबातील सदस्यांकडून, मित्रमैत्रिणींकडून मदत मागायला काहीही हरकत नाही. अगदी आवश्यकता असेल तर प्रोफेशनल कौन्सिलिंग घ्यावं.

  • ७. आपण जसे पालक आहोत पण त्याआधी आपलं नवरा-बायकोचं नातं आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही पती-पत्नी म्हणून तुमचं नातं समृद्ध होत जाईल, त्यात एकरूपता येईल तसंतसं तुम्ही दोघं एकत्र, सहजपणे तुमचं पालकत्व निभावू शकाल.

  • ८. तुमची मुलं तुमच्या दोघांचं नातं कसं फुलतं ते पाहत असतात. हे पाहतच ते मोठे होतात. नात्यातील आदर आणि प्रेम मुलांना हे शिकवतं की पार्टनर्स, लग्नाचं नातं कसं असायला हवं.

  • ९. मुलांबरोबर आपलं आयुष्य मागे-पुढे होत राहतं त्या अनिश्चिततेशी जुळवून घेण्यासाठी आपल्याला फ्लेक्झिबल आणि क्रिएटिव्ह राहायला हवं. आपलं नातं फुलवण्यासाठी, एकमेकांशी सोबत राहण्यासाठी आपल्या नात्याला प्रायोरिटी द्यायला हवी.

  • १०. स्वतःची काळजी, निगा या गोष्टींना महत्त्व द्या. आपल्याला स्वतःला चार्ज करण्यासाठी, ताणाचं नियोजन करण्यासाठी वेळ द्या. या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या तर त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या वैवाहिक आयुष्यावर आणि पालकत्वावर होईल.

  • ११. पालकांनो तुमचं भक्कम आणि प्रेमळ वैवाहिक आयुष्य हे एका आनंदी कुटुंबाचा मजबूत पाया बनायला मदत करतात हे आपण ओळखायला हवं.

  • १२. तुमच्या मुलांना स्वावलंबी बनवण्यास प्रोत्साहन द्या. यामुळे मुलांचा आत्मविश्वास तर वाढेलच तसेच तुमचा ताणही कमी होईल. कारण जेव्हा मुलं आपला नाश्ता तयार करायला शिकतात, रूम आवरतात, स्वतः एकट्याने खेळायला लागतात तेव्हा तुम्ही दोघं एकमेकांना वेळ देऊ शकता. हे सुरुवातीला थोडं काळजीत टाकणारं वाटेल, पण हळूहळू मुलांनाही स्वातंत्र्य, स्वावलंबन मिळाल्याने मुलं ही कौशल्य शिकतील.

  • १३. पालकत्व निभावताना तुम्ही दोघं कोणत्या महत्त्वाच्या मूल्यांना प्राधान्य देणार आहात याची यादी करा. उदा. प्रेम, कुटुंब, काम या क्रमाप्रमाणे जर आयुष्य जगलात, तर हा समतोल साधता येईल.

  • १४. मुलांसमोर दोघं भांडू नका. तुमची मतं, विचार एकमेकांना पटतीलच असं नाही. पण तुमचे मतभेद मुलांसमोर दिसू देऊ नका. आपापसात बोलल्यावर मग मुलांशी याबद्दल चर्चा करा. यामुळे तुम्ही दोघं एक टीम राहाल आणि मुलांशी बोलताना तुमच्या शब्दांना वजन राहील.

  • १५. रोज आपल्या पत्नीशी तसेच पतीशी आणि मुलांशी किमान १५ मिनिटे तरी क्वालिटी टाईम घालवा. यातून मीही समोरच्या व्यक्तीसाठी महत्त्वाचा आहे असं समोरच्याला वाटते.


स्वतःची काळजी घेणं, स्वतःच्या मनाला, नात्याला खूश ठेवणं म्हणजे स्वार्थ नव्हे तर लग्नाच्या नात्याला पोषण दिलंत तर पालकत्वही बहरून येईल. वैवाहिक आयुष्यातही कठीण, संघर्षपूर्ण काळ येतो पण योग्य दृष्टिकोन ठेवलात तर मार्ग नक्कीच निघू शकतो. तुमच्या दोघांमध्येही जे जे चांगलं आहे ते जेव्हा एकत्र येईल त्याने संसाराचं नातं फुलत जाईल. हेच तर या नात्याचं सौंदर्य आहे. तो हट्टी, आक्रमक असेल तर ती समजूतदार, लवचिक मनाची असेल तरीही दोघे मिळून प्रेमाला आणि पालकत्वाला आवश्यक कॉम्बिनेशन देऊ शकाल आणि नक्कीच समतोल साधू शकाल.

Comments
Add Comment