Sunday, August 10, 2025

बदल स्वीकारणारा माणूस !

बदल स्वीकारणारा माणूस !

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ


खूप दिवसांपासून वाटत होते की, एआयवर लिहावे. आज अचानक एका चित्रकार मित्राचा फोन आला. त्याने अलीकडेच ‘जहांगीर आर्ट गॅलरी’त एक चित्रप्रदर्शन लावले होते. मित्रपरिवार, नातेवाईक येऊन त्यासमोर उभे राहून मस्त फोटो वगैरे काढून गेले. त्यानेही ते सगळे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि आनंदात त्याचे चार दिवस गेले. शेवटच्या दिवशी लावलेली चित्रे उतरवताना त्याच्या लक्षात आले की, या चार दिवसांत त्याचे एकही चित्र विकले गेले नाही.


आजच्या एआयच्या जमान्यामध्ये आपल्याला काही क्षणात हवे ते चित्र, हव्या त्या रंगात सहज उपलब्ध होऊ शकते. त्याचे प्रिंट आऊट काढले आणि फ्रेम केले की झाले. कोणीही हाताने काढलेल्या चित्रापेक्षा हे चित्र आपल्याला जास्त हुबेहूब असल्याचे जाणवते. या आकर्षक चित्राला त्या घरात येणारा प्रत्येक जण निश्चितपणे वाखाणतो. आपण जर एखाद्या चित्रकाराकडून चित्र विकत घेतले तर आपल्याला ते साधारण पाच हजाराला पडत असेल तर हे चित्र शंभर-दीडशे रुपयांत घराच्या भिंतीची शोभा वाढवते. कमीत कमी कष्ट आणि घरबसल्या आपण खूप काही करू शकतो!


आजच्या काळात घरात डिश वॉशर आणि वॉशिंग मशीन या दोन मशीन असल्या तरी त्या पुरेशा असतात. एक बटन दाबल्यावर लादी स्वच्छ करणारे मशीन स्वतःच घरात अगदी सगळ्या फर्निचरखालून फिरून परत येऊन जाग्यावर स्थिर होते. घरकाम करणाऱ्या मदतनीसांचीही अनेकांना गरज पडत नाही.


कोरोनानंतर तर अनेक घरकाम करणाऱ्या महिलांच्या नोकऱ्या गेलेल्या होत्या. तबला, पेटी, व्हायोलिन, गिटार हे शिकण्यासाठी पंधरा-वीस वर्षे घालवलेल्या कलाकारांना आजकाल प्रत्यक्ष ही वाद्ये वाजवण्यासाठी बोलवले जात नाही, संगीत क्षेत्रामध्ये प्रचंड स्थित्यंतरे झाली आहेत. एआयच्या मदतीने कोणताही संगीतकार घरी बसून कोणत्याही गाण्याला व्यवस्थित संगीत देऊ शकतो. स्वतःच गाऊन व्हॉइस ओव्हर करू शकतो, म्हणजे ते गाणे पुरुषी किंवा स्त्रीच्या आवाजात ते ढाळू शकतो. यापुढे जाऊन एखाद्या लहान बालकाच्या आवाजात किंवा कोणत्याही प्राणी-पक्ष्यांच्या वा रोबोटच्या आवाजामध्ये हे गाणं रूपांतरित करू शकतो! म्हणजे संगीतातील माफक ज्ञान आणि तंत्रज्ञानातील उत्कृष्ट ज्ञान असलेला एखादा माणूस अतिशय उत्कृष्ट असे गाणे घरबसल्या तयार करू शकतो.


अशी आणखी कितीतरी उदाहरणे देता येतील. साहित्य-कला या क्षेत्रांमध्ये एआय तंत्रज्ञान मदतनीस म्हणून आलेले नाही, तर ते या क्षेत्रांवर आता अधिराज्य गाजवत आहे. मग आता असा प्रश्न उरतो की, माणसाने कोणत्या कला शिकाव्या? भरमसाट पैसा खर्च करून आणि वेळ देऊन त्या का शिकाव्या? त्यांनी शिकलेल्या ज्ञानाचा पुढे त्यांना आनंदासाठी वा अर्थाजनासाठी उपयोग होणार आहे का? याचे उत्तर खरोखरी माझ्याकडे तरी नाही.


कोणत्याही क्षेत्रातील नवनिर्मिती हे सृजन असले तरी तंत्रज्ञानाच्या युगात त्याची किंमत कमी होत आहे. कमी वेळात, कमी खर्चात जर काही आपल्याला मिळत असेल, तर कोणताही माणूस स्वाभाविकपणे त्याच्याकडे वळू शकतो!


एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण मराठीत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ असे म्हणू शकतो, तर ही कृत्रिम बुद्धिमत्ता, नैसर्गिक बुद्धिमत्तेवर मात करत आहे. आपण जर एआयची व्याख्या पाहिली तर लक्षात येते की, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे तंत्रज्ञान आहे जे संगणक आणि मशीन यांना मानवी शिक्षण, आकलन, समस्या सोडवणे, निर्णय घेणे, सर्जनशीलता आणि स्वायत्तता यांचे अनुकरण करण्यास सक्षम करते. एआय कोणतीही उपकरणे पाहू आणि ओळखू शकतात. ते मानवी भाषा समजू शकतात आणि प्रतिसाद देऊ शकतात.


आता हे सगळे पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की, या एआयमुळे आरोग्यक्षेत्रात केवढी क्रांती झाली आहे. शरीराच्या बाहेरून आपल्याला शरीरातल्या सगळ्या घडामोडी कळू शकतात. छोट्यातले छोटे हाडातले तडे दिसू शकतात, रक्तातले घटक कळू शकतात, आणखीही खूप काही. माणसाचे आरोग्य वाढवण्याच्या अनेक क्लृप्त्या एआयकडे आहेत.


खरंतर याविषयीचा एक व्हीडिओ लॉकडाऊनच्या काळात पाहिलेला जशाचा तसा आठवत आहे. चायनामधील एका हॉस्पिटलमध्ये कोरोना झालेल्या रुग्णांपर्यंत त्यांची औषधं आणि जेवण हे रोबोटनी पोहोचलेले होते, जेणेकरून निरोगी माणसांना या संसर्गजन्य आजारी माणसांचा संपर्क टाळता आला. बाकी त्या रुग्णांसमोर ठेवलेल्या संगणकाद्वारे ते व्यवस्थित डॉक्टरांशी संवाद साधून त्यांना काय हवे ते रोजच्या रोज कळवत होते.


जग झपाट्याने बदलत आहे. इतर देशांमध्ये थोडेसे आधी आलेले तंत्रज्ञान आपल्यापर्यंत हळूहळू पोहोचत आहे. आपला देशसुद्धा या तंत्रज्ञानामध्ये प्रगती करत आहे ही निश्चितपणे अभिमानाची बाब आहे. ‘जे होते ते नेहमी चांगल्यासाठीच!’ असे मानणारी मी एवढीच अपेक्षा करत आहे की एआयच्या काळात, माणसाने माणसाला ‘माणूस’ म्हणून समजून घ्यावे, बस इतकेच !
pratibha.saraph@ gmail.com

Comments
Add Comment