
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जुलै २०२५ चा १५०० रुपयांचा हप्ता जमा झाला आहे. हा हप्ता जमा केल्यानंतर राज्य शासनाने अपात्र ठरलेल्यांच्या चौकशीचे संकेत दिले आहेत. चौकशी करण्यासाठी महिला बालकल्याण विभागाकडून जिल्हा प्रशासनाला आदेश देण्यात आला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेशाचं पत्र देण्यात आलं आहे.
जिल्हा पातळीवरील महिला आणि बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ही अपात्र लाभार्थी महिला शोधण्याची मोहीम आता सुरु करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत एकाच घरातील दोन पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मात्र दोन पेक्षा जास्त आणि 21 ते 65 वर्षे वयोगटात न बसणाऱ्या तब्बल 26 लाख महिलांना या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली होती. या महिलांची यादी महिला आणि बालकल्याण विभागाने तयार केली आहे.
लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष सुरुच राहणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पाच वर्षे सुरूच राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. लाडक्या बहिणींना मिळत असलेल्या १,५०० रुपयांच्या हप्त्यात लवकरच आणखी वाढ करण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. मोदी सरकारच्या लखपती दीदी योजनेचाही राज्यातील महिलांना लाभ होत आहे. महाराष्ट्रात २५ लाख लखपती दीदी झाल्या आहेत. लवकरच ही संख्या एक कोटींवर नेणार आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.