Sunday, August 10, 2025

१८ वर्षांच्या भारतीय विद्यार्थ्याला ‘जॅकपॉट’

१८ वर्षांच्या भारतीय विद्यार्थ्याला ‘जॅकपॉट’

दुबईत जिंकली ८.७ कोटींची लॉटरी


दुबई : मूळच्या हिंदुस्थानी विद्यार्थ्याला दुबईत ड्युटी फ्री मिलेनियम मिलियनेयर रेफल्समध्ये जॅकपॉट लागला आहे. वेन नैश डिसूजा असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो अवघ्या १८ वर्षांचा आहे. वेन हा इलिनोइस अर्बाना शँपेन विद्यापीठात एअरोस्पेस इंजिनीअरिंगचा विद्यार्थी आहे. वेनने २६ जुलैला शिक्षणासाठी अमेरिकेला जाताना दुबईतील विमानतळावर लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते.


दुबईत जन्मलेला वेनने सांगितले की, त्याचे कुटुंब दुबई ड्युटी फ्री प्रमोशनमध्ये गेल्या ३० वर्षांपासून नियमितपणे तिकीट खरेदी करत आहेत. मी पाच वर्षांचा असल्यापासून विमान प्रवास करत आहे, तर आई-वडील गेल्या ३० वर्षांपासून हा विमान प्रवास करतात, असे वेनने सांगितले. मी चार वर्षांसाठी अमेरिकेला जात होतो. त्यामुळे मी स्वतः प्रयत्न करत होतो. तिकीट खरेदी करण्यासाठी मी माझ्या वडिलांच्या अकाऊंटचा वापर केला. कारण मी १८ वर्षांचा झालो त्यावेळी माझ्याकडे अकाऊंट ओपन करण्यासाठी वेळ नव्हता. मी स्वतःला भाग्यवान समजतो.


तिकीट खरेदी करताना मला वाटत होते की, काही तरी चांगले होईल, असे वेन म्हणाला. ज्यावेळी तब्बल १० लाख डॉलर जिंकल्याचा मला फोन आला, त्यावेळी मी झोपलो होतो. मला सुरुवातीला विश्वास बसला नाही. ज्यावेळी मला विचारण्यात आले की, जिंकलेल्या पैशांचे काय करणार, त्यावेळी मी सांगितले की, काही पैसे मी माझ्या व बहिणीच्या शिक्षणावर खर्च करणार आहे. तसेच काही रक्कम दुबईत मालमत्ता खरेदीवर खर्च करणार आहे.


१९९९ पासून दुबईत ड्युटी फ्री ड्रॉची सुरुवात झाल्यानंतर १० लाख डॉलर म्हणजे जवळपास ९ कोटी रुपये जिंकणारा वेन हा २५५ वा व्यक्ती ठरला आहे. दुबई ड्युटी फ्रीच्या माहितीनुसार, मिलेनियम मिलियनेयर प्रमोशनच्या विजेत्यांना १० लाख डॉलर जिंकणाऱ्या ५ हजारांपैकी एका व्यक्तीला ही संधी मिळते. आतापर्यंत केवळ १० लोकांना हा पुरस्कार दोनदा मिळाला आहे.

Comments
Add Comment