Saturday, August 9, 2025

देशातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बंगळुरूमध्ये उभारले जाणार

देशातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बंगळुरूमध्ये उभारले जाणार

बंगळुरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूमधील बोम्मासंद्राच्या सूर्या सिटीमध्ये एक भव्य नवीन क्रिकेट स्टेडियम बांधण्याची घोषणा केली आहे. या स्टेडियमची क्षमता ८० हजार प्रेक्षकांची असून, प्रेक्षक क्षमतेच्या बाबतीत हे देशातील दुसरे सर्वात मोठे स्टेडियम ठरेल. सध्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम हे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे.



१,६५० कोटी रुपयांचा प्रकल्प


हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प १६५० कोटी रुपये खर्चून उभारला जाईल आणि त्याचा संपूर्ण खर्च कर्नाटक गृहनिर्माण मंडळाकडून केला जाणार आहे. हे नवीन स्टेडियम सध्याच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमपासून सुमारे २२ किलोमीटर दूर आहे. नुकत्याच रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या (RCB) आयपीएल विजयाच्या सोहळ्यादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर हे स्टेडियम बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जाते. या घटनेत ११ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.



केवळ स्टेडियम नव्हे, क्रीडा संकुल


या प्रकल्पात केवळ क्रिकेट मैदानच नाही, तर अनेक आधुनिक सुविधा असणार आहेत. यामध्ये आठ इनडोअर आणि आठ आऊटडोअर क्रीडा सुविधा, एक अत्याधुनिक जिम, प्रशिक्षण केंद्र, स्विमिंग पूल, गेस्ट हाऊस, हॉस्टेल, हॉटेल आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांसाठी कन्व्हेन्शन हॉल यांचा समावेश आहे. हे स्टेडियम बंगळुरूमधील बीसीसीआयच्या नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीप्रमाणे विकसित होण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाही याचा मोठा फायदा होणार आहे.

Comments
Add Comment