Saturday, August 9, 2025

अयोध्येत श्रीराम तर बिहारमध्ये सीताधाम; अमित शाहांच्या हस्ते सीतेच्या मंदिरासाठी पायाभरणी

अयोध्येत श्रीराम तर बिहारमध्ये सीताधाम; अमित शाहांच्या हस्ते सीतेच्या मंदिरासाठी पायाभरणी

सीतामढ़ी : बिहारच्या सीतामढ़ी येथील पुनौरा धाम येथे माता जानकीच्या भव्य मंदिराचा शिलान्यास झाला. हा केवळ धार्मिक सोहळा नाही, तर मिथिलाच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनाचा एक ऐतिहासिक क्षण आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.


बिहारमधील पुनौरा धाम अर्थात माता सीतेची जन्मभूमी. मिथिलाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा केंद्रबिंदू. 67 एकर जागेत 882 कोटी रुपये खर्चून बांधलं जाणारं हे मंदिर मिथिलच्या गौरवाचं प्रतीक आहे. राजस्थानमधील बंसी पहाडपूर लाल दगडांनी बांधण्यात येणाऱ्या या मंदिराचं डिझाईन अयोध्या राम मंदिराचे वास्तुकार आशिष सोमपुरा यांनी तयार केलंय. मंदिर परिसरात ‘सीता वाटिका’, ‘लव-कुश वाटिका’, संग्रहालय, जलाशय आणि पर्यटकांसाठी हॉटेल्स, रेस्ट हाऊस यांसारख्या सुविधा असतील.



शिलान्यास समारोहात 11 पवित्र नद्यांचं जल आणि 21 तीर्थस्थळांच्या मातीचा वापर करण्यात आला. तिरुपती मंदिराकडून 11 हजार लोकांसाठी लाडूचा प्रसाद तयार करण्यात आला, तर कोलकाताच्या कलाकारांनी हा सर्व परिसर आकर्षक अशा फुलांनी आणि दिव्यांनी सजवला.


मिथिला क्षेत्र आपल्या मैथिली भाषा आणि सांस्कृतिक समृद्धीसाठी ओळखलं जातं. मात्र गेल्या काही दशकांत येथील लोकसंख्या आणि सामाजिक बदल हे चिंताजनक बनले आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार, किशनगंजमध्ये 78 टक्के, कटिहारमध्ये 65 टक्के, पूर्णियामध्ये 50 टक्के आणि मधुबनी-दरभंगामध्ये 32 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. ही वाढती टक्केवारी चिंतेचा विषय ठरला. स्वर्गीय कामेश्वर चौपाल यांनी 2023 मध्ये हा आकडा 39 टक्क्यांपर्यंत पोहचला असा अंदाज वर्तवला होता.


या बदलामागे बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी, तबलीगी जमातीच्या कारवाया आणि अल्पसंख्याकांना मिळणारी सरकारी मदत ही प्रमुख कारणं आहेत. यामुळे मिथिलामध्ये हिंदूंची सांस्कृतिक ओळख पुसट होत चाललीय. 1980 च्या दशकात तत्कालीन काँग्रेस सरकारने उर्दूला दुसरी राजभाषा बनवून मैथिलीला डावललं, ज्यामुळे हिंदूंची भाषिक आणि सांस्कृतिक ओळख कमकुवत झाली.


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुनौरा धाम शिलान्यासादरम्यान घुसखोरीच्या मुद्द्यावर ठाम भूमिका मांडली. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीतून घुसखोरांना हटवणं गरजेचं असल्याचं त्यांनी एक्सपोस्टद्वारे म्हटलंय. 'आमचं संविधान भारतात जन्म न झालेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार देत नाही. राहुल बाबा, तुम्ही संविधान घेऊन फिरता, किमान ते उघडून नीट वाचा. या घुसखोरांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊ देता कामा नये, मात्र विरोधक मतदार याद्या पुनर्निरीक्षणाला विरोध करताहेत, कारण घुसखोर ही विरोधकांची व्होट बँक आहे, असं अमित शाहा यांनी ठणकावून सांगितलं होते.


अमित शाह यांनी मिथिलामध्ये वाढत्या कट्टरवादी कारवायांवर आणि घुसखोरीबाबत चिंता व्यक्त केलीय.पुनौरा धामसारख्या प्रकल्पांमुळे सनातन धर्माच्या जडांचं संरक्षण होईल आणि हिंदूंमध्ये एकता निर्माण होईल, ही एकता राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाची असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.


पुनौरा धाम मंदिराचा शिलान्यास हा केवळ धार्मिक प्रकल्प नाही, तर मिथिलाच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा आणि आर्थिक विकासाचा मार्ग आहे. या मंदिरामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल. स्थानिकांना रोजगार मिळेल आणि ‘अमृत भारत एक्सप्रेस’सारख्या पायाभूत सुविधांमुळे क्षेत्राची कनेक्टिव्हिटी सुधारेल. ‘सीता वाटिका’ आणि ‘लव-कुश वाटिका’सारखी प्रतीकात्मक स्थळं मैथिलाच्या संस्कृतीला नवजीवन देतील.


सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मंदिर मिथिलामध्ये वाढत्या धर्मांतर आणि कट्टरतावादी कारवायांवर अंकुश ठेवण्यास मदत ठरणार आहे. तसंच हे मंदिर सनातन धर्माचा पाया मजबूत करत हिंदूंमध्ये एकता आणि गौरवाची भावना निर्माण करेल, यात शंका नाही.


पुनौरा धाम येथील माता जानकी मंदिराचा शिलान्यास हा मिथिलाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक गौरवाचा पुनर्जन्म आहे. हा प्रकल्प मिथिलाच्या बदलत्या रचनेला आणि वाढत्या कट्टरपंथाला आव्हान देणारा ठरेल. अमित शाह यांनी घुसखोरांविरोधात घेतलेली ठाम भूमिका आणि पंतप्रधान मोदी-नितीश सरकारचं हे पाऊल राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देणारं आहे.

Comments
Add Comment