
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी दिल्लीत दोनजण भेटले. त्यांनी राज्यात २८८ पैकी १६० जागांवर जिंकवून देण्याची हमी दिली होती. त्यावेळी मी त्यांची गाठ राहुल गांधी यांच्याशी घालून दिली. त्या लोकांना जे जे काही बोलायचं होतं, ते राहुल गांधी यांच्या समोर म्हटलं.आपण या प्रकारात पडू नये, असे आम्ही ठरवले. हा आपला रस्ता नाही, लोकांचा निर्णय असेल तो आपण स्वीकारू असा आम्ही विचार केल्याचे शरद पवार म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत मनात काही शंका नाही. निवडणूक काळात अशी मोठी आश्वासनं देणारे अनेक भेटत असतात. त्याकडे मी तेव्हा दुर्लक्ष केले, असे शरद पवार म्हणाले. पण शरद पवारांच्या दाव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. याआधी १९९३ मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्री या पदावर असताना एक बॉम्ब मुसलमानांच्या वस्तीत फुटल्याचा दावा केला होता. जो खोटा असल्याचे पुढे त्यांनीच श्रीकृष्ण आयोगाच्या समोर सांगितले होते. धार्मिक संघर्ष टाळण्यासाठी खोटी माहिती दिली होती, असा बचाव त्यांनी केला होता. यामुळे यावेळी तरी पवारांचा दावा किती खरा आहे अशा स्वरुपाची चर्चा सुरू झाली आहे.
याआधी राहुल गांधी यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन मतदार याद्यांविषयी काही प्रश्न उपस्थित केले होते. यावर प्रतिक्रिया देताना तक्रार लेखी स्वरुपात द्या तातडीने चौकशी करुन योग्य ती कारवाई करू; असे निवडणूक आयोगाने सांगितले. पण राहुल गांधी यांनी लेखी स्वरुपात निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवणे टाळले. यानंतर आयोगाने वेगवेगळे मुद्दे मांडत राहुल गांधी यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीआधी दोन माणसं भेटल्याचा दावा केला आहे. पण या माणसांबाबत सविस्तर माहिती देणे टाळले आहे.