Sunday, August 31, 2025

रत्नागिरीत निवृत्त शिक्षिकेचा 'या कारणासाठी' केला खून

रत्नागिरीत निवृत्त शिक्षिकेचा 'या कारणासाठी' केला खून

रत्नागिरी : धामणवणे (ता. चिपळूण) येथे झालेल्या निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी (वय ६८) यांचा खून झाला. या प्रकरणाचा पोलिसांनी वेगवान तपास करत उलगडा केला आहे.

या प्रकरणात गोंधळे गावातील जयेश गोंधळेकर या तरुणाने दागिने व पैशांसाठी खून केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.

जयेश गोंधळेकर मूळ गोंधळे गावचा असून, जोशी यांच्या ओळखीतील होता. काही वर्षांपूर्वी तो सातारा येथे नोकरी करत होता, मात्र सध्या बेरोजगार होता. आर्थिक गरजेतून त्यानेच हा खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले.

घराचा दरवाजा तोडलेला नसून, आतूनच उघडून खून करण्यात आला असल्याने ओळखीच्या व्यक्तीकडूनच गुन्हा घडल्याचा पोलिसांचा अंदाज होता. तो खरा ठरला.

गुरुवारी सकाळी खुनाच्या घटनेचा उलगडा झाला. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी कॉम्प्युटर हार्डडिस्कही गायब केल्याचे आढळले.

वर्षा जोशी या दाभोळ (ता. दापोली) येथील महाकाळ कुटुंबातील असून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून निवृत्त झाल्या होत्या. पतीच्या निधनानंतर त्या धामणवणे येथे एकट्याच राहत होत्या.

निवृत्तीनंतर त्यांनी नर्मदा परिक्रमाही पूर्ण केली होती आणि काही दिवसांत हैदराबादला जाण्याचा त्यांचा मानस होता. मैत्रिणीचा संपर्क न झाल्याने संशय निर्माण झाला. एका तरुणाला चौकशीसाठी पाठविल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.

Comments
Add Comment