Saturday, August 9, 2025

Nagpur Temple Collapsed: महालक्ष्मी मंदिरातील निर्माणाधीन छत कोसळले, १७ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

Nagpur Temple Collapsed: महालक्ष्मी मंदिरातील निर्माणाधीन छत कोसळले, १७ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

कोराडीच्या महालक्ष्मी मंदिर परिसरातील घटना


नागपूर:  नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या महालक्ष्मी मंदिर परिसरात निर्माणाधीन बांधकाम कोसळून १७ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज, शनिवारी घडली. घटनेची माहिती मिळताच प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सदर ठिकाणी धाव घेतली.

यासंदर्भातील प्रारंभिक माहितीनुसार कोराडी इथल्या महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात निर्माण कार्य सुरू आहे. खापरखेडा ते कोराडी मंदिर मार्गावर तिर्थ क्षेत्र विकास निधीतून भव्य स्वागत द्वार उभारण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी शनिवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमाराला ३५ फूट उंचीचे छत कोसळल्याची घटना घडली.

 

प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात सुमारे १७ जण जखमी झाले असून त्यापैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर सदर बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या लोकांनी घटनास्थळाहून काढता पाय घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. घटनास्थळी स्थानिक प्रशासन, पोलिस आणि एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झाली आहे.

यासंदर्भात नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर म्हणाले की, या अपघातात एकूण १७ जण जखमी झाले आहेत. जखमींना ३ खासगी रुग्णालयात हलवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान सदर बांधकामाचे कंत्राट कुठल्या कंपनीचे आहे याबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात असून त्यासंदर्भात कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Comments
Add Comment