मुंबई: मुंबई नागपूर विशेष ट्रेन सहा तास उलटून देखील आली नसल्याने प्रवाशाचा प्रचंड संताप झालेला पाहायला मिळत आहे. मुळात ही ट्रेन मध्यरात्री १२ वाजता उशिरा निघते, सध्या सुट्टीचे आणि सणाचे दिवस असल्यामुळे या ट्रेनसाठी अनेक प्रवासी मध्यरात्रीच्या सुमारास CSMT स्थानकावर ट्रेनची वाट पाहत उभे होते. मात्र मध्यरात्र उलटून सकाळ होण्यास आली तरी ट्रेन न आल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत, काहीनी तर आक्रमक पवित्रा घेत सकाळी सहा वाजता निघणारी गीतांजली एक्सप्रेस रोखली.
रक्षाबंधन, गणेशोत्सव या कालावधीमध्ये भारतीय रेल्वेकडून नियमित फेऱ्यांशिवाय विशेष ट्रेन चालवल्या जातात. रेल्वेकडून चालवल्या जाणाऱ्या विशेष ट्रेनला प्रवासी देखील चांगला प्रतिसाद देतात. मध्य रेल्वेकडून मुंबई नागपूर विशेष ट्रेन ही गाडी जाहीर करण्यात आली होती. मात्र, रात्री 12.20 वाजता सुटणारी गाडी सकाळी 6 वाजले तरी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये न आल्यानं प्रवासी प्रंचड संतापल्याचं दिसून आलं. मध्य रेल्वेचं या घटनेसंदर्भात अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेलं नाही.
मुंबई नागपूर विशेष ट्रेन सहा तास उलटून ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये आलीच नाही. यामुळं या ट्रेनसाठी ज्यांनी बुकिंग केलं होतं ते प्रवासी प्रचंड संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. प्रवाशानी रेल्वे स्थानक परिसरात आक्रमक भूमिका घेतली.
अधिकाऱ्यांना ही घातला प्रवाशांचा घेराव
मुंबई नागपूर विशेष ट्रेनच्या प्रवाशांनी सहा वाजता निघणारी गीतांजली एक्सप्रेस जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. संतापलेल्या प्रवाशांनी रेल रोको करण्याचा निर्णय घेतल्याचं देखील दिसून आलं. काही प्रवासी रेल्वे ट्रॅकवर जाऊन उभे राहिले होते. गीतांजली एक्स्प्रेस ही दररोज सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईहून नागपूरला जाते. विशेष ट्रेनचे प्रवासी ही ट्रेन सुटण्यापूर्वी आक्रमक झाले होते.