
नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण
विरार : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात गंगोत्री धाम येथील एका गावाजवळ ५ ऑगस्ट रोजी भीषण ढगफुटी झाली आहे. त्यामुळे परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच ठिकाणी गंगोत्री धाम येथे देवदर्शनासाठी गेलेल्या विरार पूर्व येथील एकाच कुटुंबातील सात जणांचा तीन दिवसांपासून संपर्क होत नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात गंगोत्री धाम या ठिकाणी लाखो भाविक देवदर्शनासाठी जात असतात. गंगोत्री धाम आणि मुखाच्या जवळ धराली गाव असलेले आहे. गंगोत्री येथे जाणाऱ्या अनेक यात्रेकरूंचा याच गावात मुक्काम असतो. ५ ऑगस्ट रोजी या गावच्या वरच्या बाजूस खीर गंगा पाणलोट क्षेत्रात ढगफुटी झाली. या घटनेत धरालीच्या बाजारपेठेतील हॉटेल्स आणि दुकाने पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे बंगल्याप्रमाणे कोसळली आणि संपूर्ण बाजारपेठ पुरात वाहून गेली. लष्कराच्या दहा जवानांसह अनेक नागरिकही या घटनेनंतर बेपत्ता आहेत. दरम्यान, विरार पूर्व येथील कोटकर कुटुंब गंगोत्री धाम या ठिकाणी दर्शनासाठी गेले आहे. ३१ जुलै उत्तराखंड येथे गेलेले कोटकर कुटुंबीय १३ ऑगस्ट रोजी मुंबई येथे परत येणार होते. मात्र धराली गावाजवळ घडलेल्या ढगफुटीच्या घटनेनंतर या कुटुंबासोबत त्यांच्या नातेवाइकांचा संपर्क झालेला नाही. त्यामुळे कोटकर यांचे विरार येथील नातेवाईक विजय दशपुते यांनी या संदर्भात पालघर जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयाला माहिती दिली आहे आणि आपल्या नातेवाइकांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. गंगोत्री धाम येथे अडकलेल्यांमध्ये दीपक कोटकर ५३, शुभांगी कोटकर ४८, शौनक कोटकर २४, शर्विल कोटकर २०, सुरेश येवले ५२, अनिकेत येवले २५ आणि नयना येवले ४४ यांचा समावेश आहे.
उत्तराखंड येथे देवदर्शन व पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबीयांबाबत माहिती मिळाली आहे. मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला या संदर्भात माहिती देण्यात आली असून, त्यांच्याकडून कोटकर कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- विवेकानंद कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी.