Monday, September 29, 2025

अमरावतीत आईने मुलीला तर आत्याने भाच्याला दिले जीवनदान

अमरावतीत आईने मुलीला तर आत्याने भाच्याला दिले जीवनदान
अमरावती : संदर्भसेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) गेल्या दोन दिवसांत दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात आईने आपल्या मुलीसाठी मूत्रपिंड दान करून तिचे प्राण वाचवले, तर आत्याने भाच्याला जीवनदान दिले. विशेष म्हणजे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या तब्बल ५८ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. आशना तहसीन ही १८ वर्षीय रुग्ण मुलगी. चांदूर बाजार तालुक्यातील देऊरवाडा या लहानशा गावची. गेल्या तीन महिन्यांपासून डायलिसीस सुरू होते, पण त्रास कमी होत नव्हता. मूत्रपिंड प्रत्यारोपण हा यावरील योग्य उपाय असल्याचे डॉक्टरांनी तिच्या कुटुंबीयांना सांगितले. मुलीच्या पुढील भविष्याचा विचार करून आई रुबीना परवीन यांनी आपले एक मूत्रपिंड हे मुलीला देण्याचा निर्णय घेतला. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आली. दुसऱ्या दिवशी आणखी एक शस्त्रक्रिया पार पडली. बडनेरा येथील ४० वर्षीय मोहम्मद समीर यांच्यावर गेल्या वर्षभरापासून डायलिसीस उपचार सुरू होते. मूत्रपिंड प्रत्यारोपण हाच योग्य उपाय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याची माहिती मोहम्मद साबीर यांच्या आत्या अब्रार बेगम अब्दूल सादिक (वय ६०) यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपले एक मूत्रपिंड मोहम्मद समीर यांना देण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया देखील विनामूल्य करण्यात आली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अविनाश चौधरी, डॉ. हितेश गुल्हाने, डॉ. राहुल पाटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. प्रतीक चिरडे, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. रोहित हातगावकर, डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ रमणिका ढोमणे, डॉ. शीतल सोळंके, डॉ. विक्रांत कुळमेथे, डॉ. माधव ढोपरे, डॉ. जयश्री पुसदेकर, डॉ.नाहीद, डॉ. रमणीय, डॉ. उज्वल अभ्यंकर, डॉ. प्रियंका कांबळे, डॉ. श्रद्धा जाधव, शीतल बोंडे, ऋषिकेश धस, डॉ.सोनाली चौधरी, डॉ. पायल रोकडे, डॉ. दिव्यानी मुंदाने यांच्यासह चमूचे सहकार्य लाभले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >