आज-काल महामार्गांवर किंवा मोठ्या रस्त्यांवर ट्रकसदृश वाहनांनी भरधाव गाड्या चालवणे आणि त्यात निरपराधांचे प्राण घेणे या घटना नित्याच्याच बनल्या आहेत. असाच प्रकार काल महाराष्ट्राचे दुसरे टोक असलेल्या विदर्भातील गडचिरोली येथे घडला. काल पहाटे गडचिरोली आरमोरी महामार्गावर काटली या गावात काही तरुण मुले व्यायाम करत होती. त्यावेळी एका भरधाव ट्रकने या सर्व तरुणांना अक्षरशः चिरडले. परिणामी चार मुलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन तरुण उपचारादरम्यान दगावले. उर्वरित जखमींवर सध्या नागपुरात उपचार सुरू आहे.
गडचिरोलीतील या घटनेमुळे साहजिकच स्थानिक नागरिक संतप्त झाले. त्या परिसरातील नागरिकांची अशा वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत कायमची तक्रार आहे. मात्र प्रशासन कोणताही ठोस निर्णय घेत नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला आणि जवळजवळ सहा तास या रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली होती. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच हालचाली केल्या आणि चंद्रपूर जिल्ह्यात असलेले शिक्षण मंत्री दादा भुसे यांना तातडीने घटनास्थळी रवाना केले. दादा भुसे यांनी लगेच दुसऱ्या मार्गाने घटनास्थळी पोहोचत आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी आणि प्रशासनातील सर्व अधिकारी देखील त्यांच्यासोबत होते. त्यांनी मृतांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली असल्याचीही घोषणा केली. तसेच स्थानिक नागरिकांच्या इतर समस्या देखील सोडवण्याबाबत त्यांच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्याचा शब्द दिला आणि मग सहा तासांनी हे संपुष्टात आले. या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने पुढील उपचारासाठी नागपूरला हलवणे गरजेचे होते. यावेळी लॉईड मेटल्सच्या प्रशासनाने पुढाकार घेत आपले हेलिकॉप्टर उपलब्ध केले आणि या जखमींना उपचारासाठी नागपूरला हलवले. गडचिरोली आरमोरी राष्ट्रीय महामार्गावर अशा प्रकारच्या अपघाताच्या घटना वारंवार घडतात. इथल्या नागरिकांनी याबाबत उपाययोजना व्हाव्यात म्हणून वेळोवेळी मागण्याही केलेल्या आहेत. मात्र प्रशासन त्याबाबत उदासीन आहे. म्हणूनच कालच्या या अपघातानंतर नागरिकांच्या संतापाचा असा उद्रेक झाला. जर प्रशासनाने वेळीच लक्ष घालून पावले उचलली असती, तर कदाचित कालचा प्रकार घडला नसता असेही बोलले जात आहे.
अपघात स्थळावरून काल शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे गडचिरोली शासकीय विश्रामगृहात पोहोचले. तिथे त्यांनी सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना भेटले. पदाधिकाऱ्यांची बैठक संपवून ते पुढल्या कार्यक्रमाला रवाना झाले खरे, मात्र शासकीय विश्रामगृहात वेगळाच कार्यक्रम बघायला मिळाला. तिथे शिवसेनेच्या दोन जिल्हाप्रमुखांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येच आधी हमरीतुमरी आणि मग हाणामारी झालेली बघायला मिळाली. गडचिरोली जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाकडून राकेश बेलसरे यांना जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. नंतरच्या काळात संपर्कप्रमुख बदलले. त्यामुळे नव्या संपर्कप्रमुखांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले संदीप ठाकूर यांना जिल्हाप्रमुख नेमले. बेलसरे आणि ठाकूर यांच्यातून विस्तवही जात नाही असे बोलले जाते. त्यामुळे मग वाद नको म्हणून गडचिरोली आणि अहेरी असे दोन भाग करून एका भागात संदीप ठाकूर तर दुसऱ्या भागात राकेश बेलसरे अशी जबाबदारी दिली गेली. काल दोन्ही गट समोरासमोर आले आणि मंत्री रवाना होताच श्रेयवादावरून वादावादी सुरू झाली आणि त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करून ही हाणामारी थांबवावी लागली. गत आठवड्यात जॉर्जिया येथील बुद्धिबळ स्पर्धेत महिलांची ग्रँड मास्टर ठरलेली ६४ घरांची राणी दिव्या देशमुख हिचे नागपुरात आगमन झाल्यावर तिचे भव्य स्वागत करण्यात आले होते. दिव्याचा शनिवारी नागपूरच्या सुरेश भट सभागृहात महाराष्ट्र शासनातर्फे भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तर राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे हे उपस्थित होते. क्रीडामंत्री झाल्यावर कोकाटेंचा क्रीडा विषयाशी संबंधित हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता. त्यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र कोकाटेंनी लिहिलेले भाषण वाचून उपस्थित पत्रकारांची निराशा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र जोरदार टोलेबाजी केली. दिव्याच्या अभिनंदनचा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला गेला तेव्हा आमचे सहकारी मंत्री भुजबळ म्हणाले की, तसेही नागपूरकर बुद्धिबळात पारंगतच आहेत असे सांगून आम्ही राजकारणी रोजच बुद्धिबळ खेळतो, एकमेकांना आम्ही चेकमेट देतच असतो, असे मिश्कील टोले आणत त्यांनी उपस्थितांना चांगलेच हसवले. या कार्यक्रमाला नागपूरकरांनी चांगलीच गर्दी केली होती.
-अविनाश पाठक