
भाव पडल्याने शेतकऱ्यांचा डोक्याला हात
महाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ, चास, थोरांदळे, जाधववाडी, लौकी, गिरवली, एकलहरे, विठ्ठलवाडी, टाकेवाडी ग्रामपंचायत क्षेत्रातील सोयाबीन पिकाला बुरशी व कीड रोगाची लागण झाली आहे. पाऊस नसल्याने रोपे करपून गेली आहेत. पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने डोक्याला हात लावला आहे. औषधफवारणी व खतांचा खर्च परवडत नसल्याचे शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यात सुमारे ३ हजार ८४५ हेक्टरवर सोयाबीन पीक घेण्यात आले आहे.
पावसामुळे जमिनीत ओलाव्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे बुरशी रोगाचा प्रादुर्भाव सर्व पिकांवर आढळून आला आहे. सोयाबीन पिकाच्या मुळ्या हुमणी खात आहेत. त्यामुळे सोयाबीनची पिके पार सुकून गेली आहेत. त्यामुळे संपूर्ण झाड वाया जाते. पावसाने ओढ दिल्याने पेरणी करण्यात आलेले सोयाबीन पिवळे पडले आहे. पिकाला मागील काही वर्षांच्या तुलनेत अतिशय कमी ४० रु.प्रति किलो बाजारभाव मिळाला आहे. शासनामार्फत खरेदी करण्यात येणारे सोयाबीन ठरावीक जिल्ह्यातच खरेदी केले गेले. हजारो क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या कोठारात पडून आहे. नव्याने सोयाबीनची पेरणी करण्यात आली. त्यावर महागड्या औषधांची फवारणी करणे परवडत नाही अशी खंत शेतकरी व्यक्त करतात.