अमरावती : माजी खासदार नवनीत राणा यांना त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अश्लील शिवीगाळ तसेच जिवे मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ (रिल) पोस्ट करणाऱ्या मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहा ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता Isaabhais या अकाउंटवरून धमकीचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. राजापेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. धमकी देणाऱ्यांना शोधण्यासाठी पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी अंजनगाव, परतवाडा, नागपूर, तुमसर, तिरोडा, दुर्ग व रायपूर (छत्तीसगड) येथे शोध मोहीम राबवण्यात आली.
तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे मुख्य आरोपी शेख ईसा शेख मुसा (वय 28, रा. पथ्रोट, ता. अंजनगाव, जि. अमरावती) यास भिलाई (छत्तीसगड) येथे पकडण्यात आले. त्याला पळून जाण्यासाठी मदत केल्याप्रकरणी त्याचा भाऊ शेख मुस्ताक शेख मुसा (वय 32, रा. पाकीजा कॉलनी, पनोट), आवसासरा मोहम्मद जाकीर शेख हसन (वय 37, रा. अंजनगाव सुर्जी) तसेच आरोपीस मिलाई येथे नेणारे ऐजाज खान अहेमद खान (वय 24, रा. पथ्रोट) आणि जुबेर सुलतान सौदागर (वय 21, रा. तरोडा रिद्धपूर) यांनाही ताब्यात घेण्यात आले.दरम्यान, आरोपीस पळून जाण्यास मदत करणारा अब्दुल मलिक शेख हसन (रा. अंजनगाव सुर्जी) आणि मिलाई येथे आश्रय देणारा जफर खान उर्फ दादु इस्लाम खान हे फरार आहेत. पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी इशारा दिला की, सोशल मीडियाचा गैरवापर करून कोणत्याही व्यक्तीबाबत अश्लील, बदनामीकारक किंवा धमकीचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.