मुंबई : ओला, उबेर या खासगी अॅप आधारित सेवांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी देशात सहकारी तत्वावर ‘भारत टॅक्सी ’ सुरू करण्याचे नियोजन आहे. ही सेवा देशातील सर्व राज्यांमध्ये सुरू करण्याची योजना आहे. पहिल्या टप्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये ‘भारत टॅक्सी ’ सेवा सुरू केली जाईल. यासाठी बहुराज्य सहकारी टॅक्सी संस्थेची नोंदणी करण्यात आली असून त्यासाठी ३०० कोटींचे भांडवल उभारण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार धोरणाची घोषणा करताना सहकारमंत्री अमित शहा यांनी डिसेंबर पूर्वी देशात सहकारी तत्वावर ॲप आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार ‘भारत टॅक्सी ’ सुरू करण्याचे नियोजन होत आहे. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ(एनसीडीसी), भारतीय कृषी फर्टिलायझर सह लि.(ईफको), गुजरात सहकारी दुग्ध विकास संस्था अशा आठ सहकारी संस्थाच्या सहभागातून ही टॅक्सी सेवा उभी राहणार आहे. भारतीय कृषक सहकारी संस्था(कृभको), राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक(नाबार्ड), राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ(एनडीडीबी) आणि राष्ट्रीय सहकार निर्यात लि.याही संस्था सहकारी टॅक्सी संस्थेच्या भागधारक असून यात सरकारचा थेट सहभाग नसेल. या सर्व संस्था सहकारी तत्वावर ही टॅक्सीसेवा टप्याटप्याने देशभरात सुरु करणार आहेत. पहिल्या टप्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात भारत टॅक्सीची सेवा सुरु केली जाणार असून त्यासाठी आतापर्यंत २०० टॅक्सी चालकांची नोंदणी करण्यात आली आहे. या योजनेची शास्त्रोक्त आखणी करण्याचे काम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट(आयआयएम) बंगळुरू करत आहे.
टॅक्सी चालकांना जास्त पैसे मिळवून देणे आणि ग्राहकांना वाजवी दरात विश्वासार्ह आणि उत्तम दर्जाची सेवा देणे या दुहेरी उद्देशाने ‘भारत टॅक्सी ’ सेवा सुरू करण्यासाठी तयारी जोरात असल्याचे राष्ट्रीय सहकार विकास महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.