
गणेशोत्सवापूर्वी महामार्ग सुस्थितीत करणार, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली आढावा बैठक
महाड (वार्ताहर) : गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महाड येथे बोलताना दिली. भोसले यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा पहाणी दौरा केला. त्यानंतर महाड येथे त्यांनी विविध शासकिय विभागांच्या अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक घेतली त्यावेळेस त्यांनी ही ग्वाही दिली. या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधिक्षक आँचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
अधिकारी वर्गाकडून ज्या पध्दतीने कागदावर कामांची पूर्तता झाल्याचे दाखविण्यात आले आहे तसे काम झाले नसून प्रत्यक्षात वास्तव वेगळे असल्याची खंत शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केली. गणेशोत्सवात वाहतूक कोंडी होवू नये यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करण्यात यावा, गतीरोधक काढून त्या ठिकाणी प्लास्टिकचे गतीरोधक टाकण्यात यावे, दिशादर्शक फलक लावावेत महामार्गालगत असलेले अतिक्रमणे काढून नो पार्किंग झोन करावे, गणेशोत्सवात महामार्गावर सुविधा केंद्रांची निर्मिती करण्यात यावी, इंधन पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी अशा सूचना शिवेंद्रराजे भोसले यांनी अधिकारी वर्गाला केल्या. महामार्गावरील जे उड्डाणपुल अपूर्णावस्थेत आहेत त्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू करता येईल का याची चाचपणी करण्याची सूचनाही दिल्या.