
प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षितपणामुळे ग्रामस्थ आगीत
अलिबाग : अलिबाग तालुक्यातील थेरोंडा-पालव या दोन गावांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा साकव कोसळला आणि अखेर प्रशासनाच्या झोपेचे परिणाम उघड झाले. ग्रामस्थांमध्ये संतापाचा उद्रेक झाला असून, त्यांनी आता प्रशासनाला थेट जबाबदार धरले आहे. या साकवाची अवस्था धोकादायक बनली होती. काँग्रेस नेते अशोक आंबुकर यांनी वेळोवेळी प्रशासनाला इशारे दिले, निवेदने देत साकवच्या स्थितीकडे लक्ष वेधले.
'वेळीच उपाययोजना नाही केल्यास मोठी दुर्घटना होईल,' असा थेट इशारा त्यांनी दिला होता. पण नेहमीप्रमाणेच सरकारी ढिसाळपणा आणि टाळाटाळ यामुळे आज अखेर तो साकव कोसळलाच.
हा साकव म्हणजे शालेय विद्यार्थी, वृद्ध, रुग्ण आणि शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनीच होती. दररोज शेकडो नागरिक याच मार्गाने प्रवास करत होते. मुसळधार पावसामुळे पाण्याचा जोर वाढला आणि पूर्वीपासूनच खचलेल्या साकवाने शेवटी साथ सोडली. 'दुर्घटनेपूर्वीच जर हे टाळता आले असते, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या अक्षम्य गलथान कारभाराचा आता तीव्र निषेध होत असून, ग्रामस्थांनी तात्काळ नव्या साकवाच्या कामाला सुरुवात न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यासोबतच, अशा धोकादायक साकवांची तत्काळ तपासणी करून पावसाळ्याआधीच योग्य उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. नाहीतर पुढचा अपघात केव्हा आणि कुठे होईल, याची कुणालाच कल्पना नसेल आणि त्याची जबाबदारी पुन्हा एकदा झोपलेल्या प्रशासनावरच येईल.