Sunday, August 10, 2025

मराठवाड्यात रेल्वे प्रकल्प सुपरफास्ट

मराठवाड्यात रेल्वे प्रकल्प सुपरफास्ट

व्यापारासाठी लागणाऱ्या मालाची ने-आण करण्यासाठी जवळचा मार्ग तयार होईल. तसे पाहिले तर मराठवाड्याच्या या मागण्या गेल्या २०-२५ वर्षांपासून सुरू आहेत; परंतु २०१४ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर मराठवाड्याच्या रेल्वेविषयक विकासाला अधिक चालना मिळाली.


भाजपच्या काळात मराठवाड्याला रेल्वे प्रकल्पांच्या बाबतीत भरभरून प्रतिसाद व सहकार्य मिळत आहे. भाजपने दुर्लक्षित मराठवाड्याकडे व प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या बाबतीत विशेष लक्ष घालून येथील अनेक प्रश्न मार्गी लावले. भाजपकडून रेल्वेच्या बाबतीत मराठवाड्यासाठी पुन्हा एक आनंदवार्ता आली. परभणी ते छ. संभाजीनगर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी मिळाली आहे. १७७.२९ कि.मी.च्या रेल्वेमार्गासाठी २ हजार १७९ कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला. अंकाई (मनमाड) ते छ. संभाजीनगर दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. केंद्र सरकारने छ. संभाजीनगर-परभणी दरम्यानच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिल्याने मराठवाड्यासाठी उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा जवळचा व वेगवान मार्ग तयार होणार आहे. आगामी तीन वर्षांत मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात प्रवासी व मालवाहतूक यामुळे वाढणार आहे. याबरोबरच तब्बल ७२.३४ कोटी रुपये खर्चून होणाऱ्या ३.२२ किलोमीटर अंतराच्या पूर्णा बायपास लाईनचा प्रकल्प मराठवाड्यातील रेल्वे वाहतूक आणि प्रादेशिक विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पूर्णा येथे होणाऱ्या नवीन स्टेशनवरही रेल्वे थांबणार आहेत. यामुळे पूर्ण शहर आणि जवळच्या गावांमधील प्रवाशांना लांब पल्ल्यांच्या रेल्वेमध्ये प्रवेश मिळणार आहे. रेल्वे बोर्डाने पूर्णा जंक्शनवरच एक नवीन बायपास बांधण्याचा निर्णय घेतला. तसेच स्टेशनजवळ एक नवीन पूर्णा रेल्वे स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हे एक रेल्वेचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल. मराठवाड्याच्या दृष्टीने पूर्णा रेल्वे स्टेशन अधिक गतिमान व रेल्वे ऑपरेशन्ससाठी महत्त्वाचे स्थान ठरणार आहे.


छ. संभाजीनगर ते परभणी दरम्यानच्या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला जेवढ्या लवकर पूर्ण करता येईल, तेवढ्या लवकर तो मार्ग पूर्ण होणे आवश्यक आहे. मराठवाड्यात मुदखेड ते परभणी या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासोबतच परभणी ते छ. संभाजीनगर या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण चार वर्षांपूर्वीच होणे आवश्यक होते. तसे झाले असते तर चार वर्षांपूर्वीच कदाचित हे काम पूर्ण झाले असते. असो. ‘देर आये दुरुस्त आये’ या म्हणीप्रमाणे मराठवाड्याच्या दुहेरीकरणाचा हा प्रश्न एकदाचा मार्गी लागला. तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यामुळेच हा प्रश्न पूर्णपणे निकाली निघाला आहे. प्रत्यक्षात छ. संभाजीनगर ते मुदखेड हे अंतर ३०० कि.मी.पेक्षा जास्त असल्यामुळे एकाच टप्प्यात या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रश्न मार्गी लागू शकला नाही. त्यामुळे त्यांनी मंत्रीपदावर असताना अंकाई ते परभणी या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी कामाचे दोन टप्पे पाडले. त्यानंतरच या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रश्न मार्गी लागला. मराठवाड्याच्या दृष्टीने हा एक मोठा टप्पा पार पडणार आहे. यासाठी ज्यांनी-ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे मराठवाड्यात कौतुक होत आहे. विशेषतः तत्कालीन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यामुळेच मराठवाड्याला अच्छे दिन आले, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. आता


छ. संभाजीनगर ते अहिल्यानगर या रेल्वेमार्गाच्या कामाला गती देणे आवश्यक आहे. हा मार्ग पुण्याला जाण्यासाठी अगदी सोयीस्कर व जवळचा मार्ग ठरणार आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी या दोन जिल्ह्यांतील नागरिकांना हा अतिशय जवळचा मार्ग ठरू शकतो.


याबरोबरच वर्धा-नांदेड या रेल्वेमार्गाचे काम विदर्भाच्या भागातून पूर्ण होत आले आहे. मराठवाड्यातील हदगावपर्यंत हे काम लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने तातडीने पाऊल उचलणे गरजेचे आहे. बीड-अहिल्यानगर रेल्वेमार्गही अंतिम टप्प्यात आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत मराठवाड्यातून विदर्भ, उत्तर भारत, दक्षिण भारताला जोडणारे चांगले रेल्वेमार्ग पूर्णत्वाकडे जात आहेत. लवकरात लवकर या मार्गांवरून रेल्वे धावली तर मराठवाड्याच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे. केवळ रेल्वेतील प्रवाशांसाठी हा मार्ग सोयीचा ठरणार नसून या मार्गावरून उद्योग, व्यापारासाठी लागणाऱ्या मालाची ने-आण करण्यासाठी जवळचा मार्ग तयार होईल. तसे पाहिले तर मराठवाड्याच्या या मागण्या गेल्या २०-२५ वर्षांपासून सुरू आहेत; परंतु २०१४ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर मराठवाड्याच्या रेल्वेविषयक विकासाला अधिक चालना मिळाली. त्यानंतर राज्यात भाजपच्या नेतृत्वाने मराठवाड्याच्या विकासाला झुकते माप दिले. मराठवाड्याचे ज्येष्ठ रेल्वे आंदोलक स्व. सुधाकरराव डोईफोडे यांनी या सर्व प्रलंबित रेल्वे प्रश्नांच्या मागण्यांसाठी वारंवार आवाज उठवला होता. मराठवाडा व शेजारी असलेल्या तेलंगणा व कर्नाटकातील खासदार व राजकारणी मंडळींकडे अनेकदा यासाठी पाठपुरावा केला. केवळ एवढ्यावरच न थांबता थेट दिल्ली रेल्वेबोर्ड गाठत त्यांनी याबाबत अनेक मागण्या लावून धरल्या. आज मराठवाडा रेल्वे प्रश्नांच्या बाबतीत हळूहळू का होईना कात टाकत आहे. मराठवाड्यातील सर्वच रेल्वे प्रश्न सुटलेले आहेत, असे नसून अजूनही जे प्रलंबित मार्ग आहेत, त्यासाठी मराठवाड्यातील नेतृत्वाला प्रयत्न करणे आवश्यक आहे. हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांनी आदिलाबाद-माहूर-वाशिम या नवीन रेल्वे मार्गाच्या प्रस्तावासाठी शासनाकडे तसेच रेल्वे बोर्डाकडे सातत्याने पाठपुरावा केला. पोहरादेवी ते माहूरची रेणुका देवी या दोन भक्ती स्थळांना जोडण्याची तरतूद महाराष्ट्र शासनाकडून निधीद्वारे मंजूर करून घेतली. तसेच हा मार्ग पूर्ण व्हावा यासाठी ते गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. याबरोबरच वर्धा-नांदेड या मार्गासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठीही त्यांनी रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा केला. नांदेड-पुणे वंदे भारत सुरू व्हावी अशी मागणी त्यांनी यापूर्वीच केलेली आहे. तसेच हिंगोली-मुंबई या सुपरफास्ट रेल्वेसाठी ही त्यांचे प्रयत्न सार्थक ठरलेले आहेत. नांदेड-देगलूर-बिदर हा रेल्वेमार्ग जोपर्यत पूर्ण होणार नाही, तोपर्यंत महाराष्ट्र व कर्नाटक यासाठी जवळचा मार्ग तयार होणार नाही.


महाराष्ट्राने स्वतःच्या वाट्याचा खर्च भरण्याची तयारी दाखवून अर्थसंकल्पात तशी तरतूदही केली आहे. आता कर्नाटकने त्यांच्या वाट्याचा खर्च देण्याची तयारी दाखवणे व तसे केंद्राला कळविणे आवश्यक आहे. याबरोबरच तेलंगणातील बोधन-ते महाराष्ट्रातील सीमेवर असलेल्या बिलोली रेल्वेमार्ग तयार करण्याचा प्रश्न रेल्वे बोर्डाकडे फाईलबंद झाला आहे. तो प्रश्न उचलून धरणे आवश्यक आहे. बिलोली हा भाग मराठवाड्याचा एक कोपरा आहे. तेथून तेलंगणाची सीमा सुरू होते. त्यामुळे या भागाच्या विकासाकडे राजकारणी व राज्य शासनाचे नेहमीच दुर्लक्ष झालेले आहे. या भागाच्या विकासाला चालना देण्याच्यादृष्टीने तेथे रेल्वेमार्ग विकसीत करणे अत्यंत आवश्यक आहे. नांदेड-पूणे वंदे भारत लवकरात लवकर सोईच्या वेळेत सुरू करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे आता स्लीपर वंदे भारत सुरू करत असताना मराठवाड्यासाठी नांदेड-पूणे या नवीन वंदे भारतची मागणी लावून धरणे आवश्यक आहे. यासाठी मराठवाड्यातील खासदारांनी वज्रमूठ बांधावी, अशी तमाम मराठवाड्यातील लाखो नागरिकांची अपेक्षा आहे. एकंदरीत भाजपच्या काळातच मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न अधिक तीव्रतेने मार्गी लागले आहेत. उर्वरित प्रश्नही भाजपच्या पुढाऱ्यांनी पाठपुरावा करून पूर्ण करून घ्यावेत, अशी मागणी मराठवाड्यातील जनतेची आहे.


- डॉ. अभयकुमार दांडगे

Comments
Add Comment