Sunday, August 10, 2025

Ajit Pawar : मोठी बातमी : पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती; अजित पवारांनी केली तीन महापालिकांची घोषणा

Ajit Pawar : मोठी बातमी : पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती; अजित पवारांनी केली तीन महापालिकांची घोषणा

पुणे : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (८ ऑगस्ट) पहाटे चाकण चौक आणि परिसरातील वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष पाहणी केली. पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गाच्या संगमावर असलेला हा चौक नेहमीच प्रचंड कोंडीसाठी कुप्रसिद्ध आहे. चाकण एमआयडीसीत असलेल्या सुमारे १,५०० उद्योगांमध्ये साडेतीन लाख कर्मचारी कार्यरत आहेत. रोज लाखभर वाहनांची वर्दळ असल्याने या भागातील कोंडी फोडणे हे सरकारसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे. पाहणीदरम्यान अजित पवार यांनी चाकणला स्वतंत्र महानगरपालिकेचा दर्जा मिळण्याची शक्यता व्यक्त केली. तसेच “चाकणची तुलना बारामतीशी करू नका,” असे स्पष्ट विधान त्यांनी यावेळी केले.




पुणे जिल्ह्यात नव्यानं तीन महापालिका कराव्या लागणार


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकण दौऱ्यात मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की पुणे जिल्ह्यात लवकरच तीन नवीन महापालिका स्थापन कराव्या लागतील. यात मांजरी–फुरसुंगी–उरळी देवाची या परिसरासाठी एक, चाकण परिसरासाठी एक आणि हिंजवडी भागासाठी एक महापालिका उभारण्याचा विचार आहे. चाकण चौकातील वाहतूक कोंडीचा आढावा घेण्यासाठी पवार पहाटे ५:४५ वाजता प्रत्यक्ष पोहोचले. नॅशनल हायवे, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. तळेगाव–शिक्रापूर मार्ग सहापदरी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची आणि त्यानंतर पुणे–नाशिक मार्ग एलीवेटेड करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “चाकणची कोंडी संपवण्यासाठी पावले उचलणे अपरिहार्य आहे. लोकांनी सहनशीलता दाखवली, पण आता यातून मुक्तता देणं गरजेचं आहे. महानगरपालिका स्थापनेबाबत काहींना आवडेल, काहींना नाही, तरीही हा निर्णय घ्यावाच लागेल,” असेही पवारांनी ठामपणे सांगितले.



पाहणी दौऱ्यावेळी पोलीस आयुक्तांवर अजितदादा भडकले


चाकण दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहतूक व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली. पहाटे ६ वाजता पाहणी करताना त्यांनी पाहिलं की, एका गाडीमुळे संपूर्ण रांगा लागल्या आहेत. “ही अवस्था सकाळी लवकरची असेल तर पिक तासांत काय होते याचा विचार करा,” अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, पाहणी दरम्यान पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चाकण चौकात वाहनं थांबवून ठेवली होती. यावर पवारांनी थेट पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांना सुनावत म्हटलं, “ओ चौबे, हे बरोबर नाही! मूर्खासारखं वाहनं थांबवून कोंडी का केली आहे? लगेच वाहतूक सुरू करा.” तसेच, चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीचा आढावा घेताना त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो दाखवत अधिकाऱ्यांना दोषपूर्ण रस्त्यांबाबतही सुनावलं.


Comments
Add Comment