Sunday, August 10, 2025

Naresh Mhaske On Uddhav Thackeray : "अरेरे... ‘हिंदुत्व’ सोडलं आणि थेट शेवटच्या रांगेत! उद्धव ठाकरेंवर शिंदे गट अन् भाजपाचा तिखट प्रहार"

Naresh Mhaske On Uddhav Thackeray :

नवी दिल्ली : दिल्ली दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत राहुल गांधी यांनी मतदार याद्यांतील अनियमितता आणि निवडणूक आयोगाविषयी प्रेझेंटेशन सादर केलं. बैठकीला उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. मात्र, समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये तिघेही शेवटच्या रांगेत बसल्याचे दिसून आले. यावरून आता शिवसेना शिंदे गट आणि भाजपाकडून उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले जात आहेत.



राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ७ ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मात्र, बैठकीपेक्षा जास्त चर्चेत आली ती तिची आसन व्यवस्था. या बैठकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसवण्यात आलं, असा मुद्दा उचलून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने टीकेची झोड उठवली आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी थेट हल्ला चढवत म्हटलंय की, “हिंदुत्व आणि आपली विचारधारा सोडली की पदरात काय येतं? शेवटची रांग!” तर शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनीही सोशल मीडियावर, विशेषत: एक्स (Twitter) वरून, या घटनेची खिल्ली उडवली. त्यांनी सूचक पोस्ट करत उद्धव ठाकरे गटावर उपरोधिक टीका केली. राजकीय वर्तुळात आता हा मुद्दा चांगलाच तापला आहे. विरोधकांकडून उद्धव ठाकरे गटाच्या राजकीय स्थानावर आणि आघाडीतल्या महत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून, या “शेवटच्या रांगे”च्या वादावरून सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे.



काय म्हणाले नरेश म्हस्के?



शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आसनव्यवस्थेच्या वादातून जोरदार टीका केली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधींच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसवण्यात आलं, यावर प्रतिक्रिया देताना म्हस्के यांनी थेट “बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान आणि स्वाभिमान शिकवला. अपमान सहन न करण्याचा धडा शिवराय आणि बाळासाहेबांनी दिला. पण तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का?” असा सवाल उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, “काँग्रेसने तुमची काय अवस्था करून ठेवली आहे बघा! तुमच्यापेक्षा एक-एक खासदार असलेले पक्ष पुढच्या रांगेत बसवले गेले, पण तुम्हाला मागे बसवलं. महाराष्ट्राचं दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवली.” म्हस्केंच्या या वक्तव्याने उद्धव ठाकरे गटावर टीकेची नवी लाट उसळली आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या या टोलेबाजीची चर्चा रंगली असून, यामुळे इंडिया आघाडीतील आंतरकलह आणि प्रतिष्ठेचे राजकारण पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे.



भाजपचे केशव उपाध्य यांची घणाघाती टीका




भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्य (Keshav Upadhyay) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आसनव्यवस्थेच्या वादातून थेट हल्ला चढवला आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसवण्यात आलं, यावर भाष्य करताना उपाध्य म्हणाले, “उद्धव ठाकरे जेव्हा भाजपासोबत होते, तेव्हा त्यांना किती मान-सन्मान मिळायचा. देशातील भाजपाचे अनेक महत्वाचे नेते मातोश्रीवर येऊन त्यांचा सत्कार करत होते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमित शाह स्वतः मातोश्रीवर आले होते.” ते पुढे म्हणाले — “पण तुम्ही हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली आणि त्यातून मानही गेला, सन्मानही गेला. हातात पडलं काय? तर आता बैठकीत अपमानाची थेट शेवटची रांग!” असा जोरदार टोला त्यांनी लगावला. केशव उपाध्य यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि भाजप यांच्यातील जुना वाद पुन्हा पेटला आहे. या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर समर्थक आणि विरोधकांमध्ये शब्दयुद्ध रंगले असून, ‘शेवटची रांग’ हा वाक्प्रचार राजकीय चर्चेचा नवा मुद्दा ठरला आहे.

Comments
Add Comment