
ठाणे (प्रतिनिधी) : गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे मात्र अजूनही ८८ गणेश मंडळांच्या अर्जाला परवानगी मिळाली नाही. परवानगी अर्ज महापालिकेत टेबलावर पडून आहेत. वर्तकनगर प्रभाग समिती हद्दीतील एकाच मंडळाला परवानगी देण्यात आली असून उर्वरित मंडळे अजूनही प्रतिक्षा यादीत आहेत. पालिका मिळणार की नाही? हा गहन प्रश्न मंडळाच्या कार्यकर्त्यांना भेडसावत आहे.
शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर, गल्लीत मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप उभारले जात आहेत. त्यासाठी ठाणे महापालिका, वाहतूक विभाग आणि अग्निशमन विभागाची परवानगी घेणे अनिवार्य आहे. मंडप उभारणीवेळी उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. परवानगीसाठी मंडळांना विविध कागदपत्रे सादर करावी लागतात. मंडप उभारणीच्या अर्जासोबत, जागेचा पत्ता, नकाशा, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची नावे आणि मंडपात फायर सिलिंडर ठेवल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे.
आतापर्यंत ५८ गणेश मंडळांनी ऑनलाइन, तर ३० मंडळांनी ऑफलाइन अर्ज केले आहेत. ऑफलाइन अर्ज करताना मंडळानी जी कागदपत्रे आहेत ती दिली आहेत. आतापर्यंत केवळ एकाच मंडळाला परवानगी देण्यात आल्याने मंडळांमध्ये नाराजी पसरली आहे. काही मंडळे वर्षानुवर्षे त्याच जागेवर गणेशोत्सव साजरा करतात. त्यामुळे अशा मंडळांनी परवानगी घेण्यापूर्वीच मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे.