Sunday, August 10, 2025

माजी सैनिक रमेश खरमाळे यांना ‘राष्ट्रपती भवन’चे आवतण

माजी सैनिक रमेश खरमाळे यांना ‘राष्ट्रपती भवन’चे आवतण

पर्यावरण रक्षणासाठी झटणाऱ्या अवलियाच्या कामाची दखल


जुन्नर : पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतलेले जुन्नरचे भूमिपुत्र माजी सैनिक रमेश खरमाळे यांच्या कार्याची पोचपावती म्हणून स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती भवन येथे होणाऱ्या समारंभासाठी त्यांना खास आमंत्रण पाठवण्यात आले आहे. या मानसन्मानाने भारावून गेलेल्या खरमाळे परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. खरमाळे परिवाराने वडज येथे ऑक्सिजन पार्कमध्ये सामुहिकरित्या वृक्षारोपण केले आहे. त्याचा व्हिडीओदेखील समाजमाध्यमावर तुफान व्हायरल झाला आहे.


जेव्हा पुणे भारतीय डाक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रपतींचे पत्र त्यांना दिले. तेव्हा त्यांची भूमातेसाठी केलेल्या योगदानाला पोचपावती मिळाली. खरमाळे कुटुंबाने पर्यावरणासाठी बीज संकलन व रोपण करणे, वृक्षारोपण, पशू-पक्ष्यांचे संवर्धनासाठी पाणवठे करणे, जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी जलशोषक चर खोदणे, प्लास्टिक संकलन करणे, जखमी पशू-पक्षी रेस्क्यू, शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक व्याख्याने देण्याच्या कामात दिवसरात्र एक केला आहे. वडजच्या ऑक्सिजन पार्कच्या निर्मितीची खुद्द् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत ‘मन की बात’ या कार्यक्रमात उल्लेख केला होता.


एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, ''तळागाळातील लोकांच्या कार्याची दखल देशाचे पंतप्रधान व महामहीम राष्ट्रपती यांच्याकडून घेतली जाते, हा संदेश पर्यावरण प्रेमींपर्यंत जाईल. पर्यावरण रक्षणासाठी नि:स्वार्थपणे काम करणाऱ्या सर्वांचा हा सन्मान आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना अधिक
बळ मिळेल.


माझ्या कुटुंबाला जीवनात तेवढा आनंद झाला नाही, तेवढा आनंद ‘मन की बात’ कार्यक्रमात सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख करून व त्यानंतर दिलेल्या आमंत्रणामुळे झाला आहे. अधिक ताकदीने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment