Sunday, August 10, 2025

Eknath Shinde : "स्वाभिमान गहाण ठेवल्याची शिक्षा; काँग्रेसनेच दाखवली जागा, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला"

Eknath Shinde :

मुंबई : दिल्लीच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत घडलेला एक प्रसंग सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे काल या महत्त्वाच्या बैठकीसाठी दिल्लीला दाखल झाले होते. त्यांच्या सोबत आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊतही उपस्थित होते. बैठकीदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणुकांमधील खोट्या मतदारांचा मुद्दा मांडत भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. पण या राजकीय चर्चेपेक्षा सोशल मीडियावर एका फोटोनं खळबळ माजवली. त्या फोटोत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे सभागृहाच्या एकदम मागच्या, म्हणजे शेवटच्या रांगेत बसलेले दिसत होते. राजकीय वर्तुळात हा फोटो झळकताच विरोधकांनी लगेचच टोलेबाजी सुरू केली. “दिल्लीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसलेला ठाकरे गट महाराष्ट्रात नेतृत्वाचं स्वप्न कसं बघतो?” अशा प्रकारच्या टिप्पणींनी सोशल मीडियावर वादाचा तडका लावला आहे. आता या “शेवटच्या रांगेच्या” फोटोपासून विरोधकांना नवा हल्ल्याचा मुद्दा मिळाल्याचं स्पष्ट दिसतं. उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्याच्या फोटोपासून रंगलेलं राजकारण अजून थांबण्याची चिन्हं नाहीत.


या संपूर्ण प्रकरणावर आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलकाट्यांची फटकारणी केली आहे. दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे मागच्या रांगेत दिसल्याने विरोधकांनी आधीच चिमटे काढले होते. पण शिंदेंनी तर सरळ “स्वाभिमान” आणि “बाळासाहेबांची विचारधारा” यावरच बोट ठेवलं. पत्रकारांनी या फोटोबद्धल विचारलं असता शिंदे म्हणाले, “जे स्वाभिमान गहाण टाकतात, बाळासाहेबांचे विचार विकतात, त्याग करतात… त्यांना अशा गोष्टींचं काहीही वाटणार नाही. त्यामुळे काँग्रेसने त्यांना त्यांची खरी जागा दाखवली असेल.” शिंदेंच्या या विधानात एकीकडे टोमणा, तर दुसरीकडे ठाकरेंच्या राजकीय भूमिकेवर थेट वार असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. म्हणजेच “शेवटच्या रांगेत बसवणं” हा फक्त फोटोतला योगायोग नव्हे, तर काँग्रेसकडून दिलेला ‘राजकीय संदेश’ असल्याचा सूर शिंदेंच्या भाषणातून दिसला.




तुम्हाला इतक्या मागे का बसवलं होतं? शिंदेंचा टोला


पुढे शिंदे म्हणाले, “ज्यांचा अपमान झाला, अवमान झाला… आणि तरीही त्यांना त्याचं काही वाटत नसेल, तर मी त्यावर काय बोलणार? खरं म्हणजे स्वाभिमान गहाण टाकणारे, बाळासाहेबांचे विचार विकणारे, त्याग करणारे… अशांना या गोष्टीचा त्रास होणारच नाही. त्यामुळे काँग्रेसने त्यांना त्यांची खरी जागा दाखवली असेल. आणि यावर प्रतिक्रिया द्यायची असेल तर ती त्यांनी द्यावी, मी नाही.” यातच त्यांनी आणखी एक खोचक टीका केली, “उलट तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे, तुम्हाला इतक्या मागे का बसवलं होतं.” म्हणजे शिंदेंच्या भाषणात फक्त टोमणेच नव्हते, तर ठाकरेंच्या नेतृत्व आणि स्थानाबद्दल सरळसरळ "तुमचं महत्त्व काँग्रेसनेच ठरवलं" असा संदेश दडलेला होता.




त्यांची जागा काँग्रेसने दाखवली...


“आम्ही बाळासाहेबांचा आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जात आहोत. विकासाचाही विचार पुढे नेतोय. म्हणूनच श्रीकांत शिंदे यांना काही देशांच्या दौर्‍यावर जाणाऱ्या डेलिगेशनचा प्रमुख बनवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणाचा सन्मान करायचा, कोणाला मान द्यायचा हे चांगलंच माहिती आहे. त्यामुळे आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहोत, आणि हा सन्मान त्या विचाराचा आहे.” “ज्यांचा अवमान झाला, अपमान झाला, आणि तरीही ज्यांना त्याचं काही वाटत नाही, अशांबद्दल मी काय बोलणार? तुम्हीच त्यांना विचारायला हवं. ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, ज्यांनी विचार सोडले, त्यांचं असंच होतं. त्यांची जागा काँग्रेसने दाखवली आहे. म्हणूनच अनेक लोक म्हणतात विचार पुढे असतात आणि लाचार मागे असतात.”

Comments
Add Comment