Friday, August 8, 2025

वसई-विरार भागातील चार उड्डाणपुलाच्या आराखड्याला रेल्वेची मंजुरी

वसई-विरार भागातील चार उड्डाणपुलाच्या आराखड्याला रेल्वेची मंजुरी

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील रेल्वेमार्गावर उभारण्यात येणाऱ्या चार नियोजित उड्डाणपुलांच्या संकल्पना आराखड्याला (जनरल अरेंजमेंट डिझाईन) रेल्वेने मंजुरी दिली आहे. उमेळमान, अलकापुरी, ओसवाल नगरी आणि विराट नगर या ठिकाणी हे रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात येणार असून या पुलांच्या आराखड्याला मंजुरी दिल्याचे पत्र रेल्वे प्रशासनाकडून बुधवारी महापालिकेला पाठविण्यात आले आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाच्या निर्मितीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.


वसई-विरार पालिका क्षेत्रातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचप्रमाणे वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विविध मार्गांवर वाहनचालकांना वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. शहरात सर्वाधिक वाहतूक कोंडी रेल्वे वसई, नालासोपारा आणि विरार या तीनही रेल्वे स्थानक परिसरात होत असते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला. वसई - विरार महापालिकेने शहरात ४ रेल्वे उड्डाणपूलांचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी एमएमआरडीएकडे पाठवला होता. त्यामध्ये वसई -नायगाव स्थानकादरम्यान उमेळमान, नालासोपारा येथील अलकापुरी, विरारच्या विराट नगर येथे आणि नालासोपारा विरार दरम्यान ओस्वाल नगरी येथे अशा चार उड्डाणपूलांचा समावेश आहे.


दरम्यान, उड्डाणपुलाच्या निमिर्तीसाठी रेल्वेची परवानगी आवश्यक असल्याने महापालिकेने चार ठिकाणी नियोजित रेल्वे उड्डाणपुलांची जनरल अरेंजमेंट डिझाईन तयार करून रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाला पाठविली होती. मात्र, त्याला अनेक दिवसांपासून मंजुरी मिळाली नव्हती. लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे अखेर पश्चिम रेल्वेने या आराखड्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या उड्डाणपुलाच्या बांधणीसाठी मिळालेली रेल्वेची मंजुरी आणि इतर कागदपत्र एमएमआरडीएकडे निधीच्या अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत. अंतिम मंजुरीनंतर हे उड्डाणपूल एमएमआरडीए आणि रेल्वेच्या रुळावरील भाग हा रेल्वेतर्फे बांधण्यात येणार आहे.



११ उड्डाणपूलांच्या कामाला गती


नायगाव ते विरार दरम्यान उमेळमान, अलकापुरी, ओसवाल नगरी आणि विराट नगर येथे उभारण्यात येणाऱ्या रेल्वेच्या चार उड्डाणपुलांसह शहरातील आणखी ७ उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला त्रस्त झेलेल्या लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. वसई विरार मधील रखडलेल्या ७ उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळावी म्हणून आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी शासनाकडे पाठपुरावा केला.अधिवेशनात सुद्धा हा विषय त्यांनी लाऊन धरला. शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व अकराही उड्डाणपूल वाहनधारकांसाठी दिलासादायक ठरणार आहेत.



रेल्वे उड्डाणपुलासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा


रेल्वेच्या ४ उड्डाणपुलांसाठी आजी माजी आमदारांसह खासदारांनी पाठपुरावा केला आहे. वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि नालासोपाराचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी या कामासाठी एमएमआरडीए आणि रेल्वे कडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर रेल्वेच्या आराखडा मंजुरीसाठी पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा आणि नालासोपाराचे विद्यमान आमदार राजन नाईक यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे. लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश आले असून अखेर रेल्वे तर्फे संकल्पना आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा