Sunday, August 31, 2025

जगप्रसिद्ध क्रिकेटपटू ख्रिस गेलच्या उपस्थितीत प्रो-गोविंदा चषकाचे अनावरण

जगप्रसिद्ध क्रिकेटपटू ख्रिस गेलच्या उपस्थितीत प्रो-गोविंदा चषकाचे अनावरण

भाईंदर : गोविंदांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या प्रो-गोविंदा लीगच्या तिसऱ्या पर्वाचा शुभारंभ या वर्षीच्या चषकाचे अनावरण मीरा रोड येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि प्रो-गोविंदा तिसऱ्या पर्वाचे ब्रँड ॲम्बेसेडर ख्रिस गेल, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, प्रो-गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक तसेच बार्सिलोनाच्या विला फ्रांका येथील विश्वविक्रम विजेत्या मानवी मनोरा संघाचे आंतरराष्ट्रीय पाहुणे यांच्या उपस्थित करण्यात आले.

प्रो-गोविंदा लीगचे तिसऱ्या पर्वाबाबत माहिती देण्यासाठी मीरा रोड येथे आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत पुर्वेश सरनाईक यांनी सांगितले की, ''७, ८ आणि ९ ऑगस्ट २०२५ रोजी वरळी येथील प्रतिष्ठित डोम, एसव्हीपी स्टेडियममध्ये तिसऱ्या पर्वाची अंतिम फेरी आयोजित केली आहे. यात १६ व्यावसायिक संघ, ३२०० हून अधिक गोविंदा आपले कौशल्य, सामर्थ्याचे प्रदर्शन करतील.

सीझन ३ मध्ये एकूण दीड कोटींची बक्षीसे ठेवण्यात आली असून प्रथम पारितोषिक ७५ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक ५० लाख रुपये, तृतीय पारितोषिक २५ लाख रुपये आहे. प्रत्येक सहभागी प्रत्येकी संघांना ३ लाख रुपये पारितोषिक दिले जाणार आहेत.

यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ख्रिस गेल म्हणाले, ‘प्रो-गोविंदा लीगचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून जोडले जाणे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मी जगभरात विविध खेळ पाहिले. पण गोविंदांमधील ऊर्जा, समन्वय आणि सांस्कृतिक अभिमान अतुलनीय आहे.

प्रो-गोविंदा लीग केवळ परंपरेचा उत्सव नाही, तर हा एक अनोखा क्रीडा प्रकार आहे, ज्यामध्ये जागतिक स्तरावर लोकांना आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता आहे. यात शारीरिक ताकद, सांघिक कौशल्य आणि परंपरेचा मिलाफ पाहायला मिळतो. या प्रवासाचा एक भाग होताना मला खूप आनंद होत आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीची आतुरतेने वाट पाहत आहे.’ असे गेल म्हणाला.

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि प्रो-गोविंदा लीगचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली, या लीगने पारंपरिक दहीहंडी उत्सवाला व्यावसायिक साहसी खेळ म्हणून एक नवी ओळख दिली आहे. महाराष्ट्र शासनाने याला अधिकृत मान्यता दिली आहे. यानंतर तरुण गोविंदांनी सादर केलेल्या सात थरांच्या मानवी मनोऱ्याची प्रात्यक्षिके करण्यात आली.

Comments
Add Comment