Thursday, August 7, 2025

PM Modi : ट्रम्पच्या धमक्यांना मोदींचं एका वाक्यात उत्तर : "शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार"

PM Modi : ट्रम्पच्या धमक्यांना मोदींचं एका वाक्यात उत्तर :

अमेरिकेच्या ५०% टॅरिफवर मोदींचा ठाम पवित्रा


नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचा निर्णय घेतला असून यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. “भारत शेतकरी आणि मच्छीमार यांच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठणकावून सांगितलं. “या भूमिकेची मला वैयक्तिक किंमत चुकवावी लागू शकते, पण मी ती किंमत मोजायला तयार आहे,” असंही मोदींनी स्पष्ट केलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही दिवसांपासून भारतावर टॅरिफ लावण्याची सातत्याने धमकी दिली होती. या महिन्याच्या सुरुवातीला २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा करण्यात आली होती, आणि आता थेट ५० टक्क्यांपर्यंत शुल्क वाढवण्यात आलं आहे.


अमेरिकेने काल रात्री भारतावर ५० टक्के आयात शुल्क लावण्याची अधिकृत घोषणा केली. गेल्या काही काळापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सातत्याने सार्वजनिक मंचांवर भारतावर टॅरिफ लावण्याबाबत वक्तव्य करत होते. दरम्यान, भारताने सार्वजनिकपणे प्रतिक्रिया देण्याचे टाळले आणि चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु डेअरी आणि कृषी क्षेत्र खुलं करण्याच्या अमेरिकेच्या मागणीला भारताने स्पष्ट नकार दिला. यामुळे दोन्ही देशांमधील ट्रेड डील फिस्कटल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताने यावर आपली भूमिका ठामपणे मांडताना, "या क्षेत्रांमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही," असा संदेश दिला आहे.





“शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार” 


हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.
ते म्हणाले, “भारतातील शेतकरी, मच्छीमार आणि डेअरी शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या भूमिकेसाठी मला वैयक्तिक पातळीवर मोठी किंमत चुकवावी लागेल, पण मी यासाठी तयार आहे.” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.



शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हे आमचं लक्ष्य : पंतप्रधान मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालकांच्या हितासाठी सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आहे. “माझ्या देशातील मच्छीमार, पशुपालक आणि शेतकऱ्यांसाठी भारत कटिबद्ध आहे. शेतीचा खर्च कमी करणं, उत्पन्न वाढवणं आणि नव्या संधी निर्माण करणं हे आमचं ध्येय आहे. शेतकऱ्यांची ताकद हीच देशाच्या प्रगतीचा खरा आधार आहे,” असं मोदी म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >