
नागपूर (अजनी) ते पुणे हे रेल्वेद्वारे ८९० किमी.चे अंतर वंदे भारत एक्सप्रेस बारा तासांत पूर्ण करेल. मागणी स्पीपर गाडीची होती पण सध्या चेअरकार सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. नियोजनानुसार नागपूर (अजनी) ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस नागपूरहून सकाळी ९.५० वाजता सुटेल आणि पुण्याकडे रवाना होईल. गाडी रात्री नऊ वाजून ५० मिनिटांनी पुण्याला पोहोचेल. सोमवारी सकाळी सहा वाजून २५ मिनिटांनी पुण्यातून नागपूरसाठी ही ‘वंदे भारत’ सुटेल. ती संध्याकाळी सहा वाजून २५ मिनिटांनी (अजनी) नागपूरमध्ये पोहोचेल. आठवड्यातून सहा दिवस ही गाडी धावणार असून, नागपूरहून दर सोमवारी आणि पुण्यातून दर गुरुवारी ही गाडी रद्द असेल.
पुण्याहून नागपूरला वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी मागील दीड वर्षापासून होत होती. या मागणीची दखल घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गाडी सुरू करण्याचे निर्देश दिले. दोन्ही शहरांदरम्यान प्रवासाचा वेळ कमी होणार असल्यामुळे या गाडीला चांगली पसंती मिळेल, अशी अपेक्षा आहे. सध्या पुण्यातून सोलापूर, कोल्हापूर आणि हुबळी या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. नागपूरची गाडी सुरू झाल्यानंतर त्यात आणखी भर पडणार आहे.