
पालिकेच्या सत्तेसाठी वसई-विरारमध्ये मोर्चेबांधणी
विरार : वसई आणि नालासोपारा बहुजन विकास आघाडीचे हे दोन्ही गड विधानसभेत जिंकल्यानंतर वसई-विरार महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी भाजपचे नेते, पदाधिकारी मोर्चेबांधणी करीत आहेत. पालिका क्षेत्रातील अनेक चर्चेतील चेहरे गळाला लावण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून हाती घेण्यात आले असून, आगामी काही महिन्यात विविध राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचे भाजपमध्ये 'इन्कमिंग' वाढणार असल्याचे संकेत आहेत.
वसई, नालासोपारा, विरार, माणिकपूर - नवघर या चार नगर पालिकेसह ५४ ग्रामपंचायतींचा समावेश करून ३ जुलै २००९ ला वसई-विरार शहर महानगरपालिका अस्तित्वात आली. पालिकेची स्थापना झाल्यानंतर महानगरपालिकेची झालेली पहिली निवडणूक ही बहुजन विकास आघाडी विरुद्ध जनआंदोलन समिती अशीच राहिली आहे. त्यानंतरच्या २०१५ च्या निवडणुकीत मात्र सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उडी घेतली असली तरी, बहुजन विकास आघाडीने या निवडणुकीत ११५ पैकी १०८ नगरसेवक निवडून आणून वसई-विरार पालिकेचा गड हा बहुजन विकास आघाडीचाच असल्याचे दाखवून दिले.
यावेळी पालिकेच्या सभागृहात भाजपचा केवळ १ नगरसेवक होता. दरम्यान, नुकतेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चांगलीच मुसंडी घेतली असून, वसई, आणि नालासोपारा या दोन्ही मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून वसई-विरार शहर पालिकेवर सुद्धा भाजपची सत्ता आणण्यासाठी आ. स्नेहा दुबे पंडित, आ.राजन नाईक, जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी समाजकारणासह राजकारणात सक्रिय असलेले नवीन चेहरे भाजपसोबत जोडण्याचे काम सुरू केले आहे.
आगामी पालिका निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकाचा आकडा एक वरून दुहेरी आणि सत्तेसाठी आवश्यक असा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसात आगरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कैलाश पाटील उर्फ काका तसेच बहुजन विकास आघाडीचे नायगावचे धरेंद्र कुलकर्णी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी प्रा. डी. एन.खरे, बिलाल पाड्याचे संदीप घरत, राजा आवळीचे नितीन भोईर, जुचंद्रचे रंजीत किनी, ग्रास कोपरीच्या सुनीता पाटील , उबाठा गटाचे गणेश भायदे, मनीष वैद्य, मिलिंद वैध, योगेश चौधरी यांच्यासह अनेक चर्चेतील चेहऱ्यांच्या हाती भाजपचा झेंडा देऊन त्या-त्या परिसरात भाजपची ताकद वाढविण्यात आली आहे.
नुकतेच उबाठा गटाचे माजी जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख, बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक नितीन ठाकूर, निलेश भानुसे, सुनील मिश्रा, वैभव म्हात्रे यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. एकंदरीतच आगामी निवडणुकीत पालिकेवर भाजपचा महापौर विराजमान व्हावा यासाठी भाजप नेते, पदाधिकारी यांच्याकडून ही व्युहरचना करण्यात येत आहे.