मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाची ५ हजार २८५ घरे आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी आतापर्यंत ४० हजार ८२३ अर्ज दाखल झाले असून, यापैकी २१ हजार ६१ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली. या लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्टच्या रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे.
ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत ५ हजार २८५ घरे व ओरोस (नि. सिंधुदुर्ग), कुळगाव- बदलापूर येथील ७७ भूखंड आहेत. १४ जुलै रोजी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ 'गो-लाइव्ह' कार्यक्रमांतर्गत करण्यात आला होता. मुंबईच्या जवळच घरे असल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, म्हाडा अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून रोख रकमेची मागणी केली जात नाही. सदनिकांच्या विक्रीकरिता प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाहीत. अर्जदाराने दलालांना बळी पडू नये, असे आवाहन म्हाडाने केले आहे.
कोकण मंडळाच्या सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण ५६५ घरे, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३००२ घरे, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत १६७७ घरे तसेच ५० टक्के योजनेअंतर्गत ४१ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत, तसेच म्हाडा कोंकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत कल्याण तिसगाव येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या घराची किंमत ९ लाख ५५ हजार रुपये आहे.