
मुंबई : तुम्ही कधी विचार केलाय का, एका पत्रात किती भावना दडलेल्या असतात? एका क्षणाचा निरोप, आनंदाचे क्षण आणि वर्षांची आठवण किंवा एखादा महत्त्वाचा सरकारी दस्तऐवज, जो तुमचं आयुष्य बदलू शकतो. पोस्ट ऑफिस म्हणजे फक्त एक इमारत नाही, ती एक भावना आहे. पण आता याच पोस्ट ऑफिसमध्ये एक मोठा बदल होतोय, जो आपल्या सर्वांना थेट प्रभावित करणार आहे.
भारतीय टपाल विभागाने आपल्या जुन्या आणि विश्वासार्ह सेवांपैकी एक असलेल्या रजिस्टर्ड पोस्ट सेवेवर १ सप्टेंबरपासून पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा आता स्पीड पोस्ट सेवेत विलीन केली जाणार असून, हा निर्णय टपाल प्रक्रिया अधिक सुलभ व एकसंध करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे, अशी माहिती बेंगळुरूच्या जनरल पोस्ट ऑफिसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
रजिस्टर्ड पोस्ट ही सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची सेवा मानली जाते. ती केवळ संबंधित प्राप्तकर्त्यालाच दिली जाते आणि महत्त्वाचे कायदेशीर दस्तऐवज, सरकारी पत्रव्यवहार यासाठी वापरली जाते. दुसरीकडे, स्पीड पोस्ट ही वेळेवर वितरणासाठी प्रसिद्ध असून, ती केवळ पत्त्यासाठी असते. ज्यामुळे घरात जो कुणी असेल तो ते पत्र स्वीकारू शकतो.

मुंबई : मुंबईतील दादर येथील प्रसिद्ध कबुतरखाना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मुंबई महापालिकेने आरोग्याचा मुद्दा ...
मात्र, मागील काही वर्षांपासून रजिस्टर्ड पोस्टची मागणी कमी झाल्याचे पाहता, या दोन सेवांचा एकत्रित उपयोग अधिक परिणामकारक ठरणार आहे. विलीन केल्यानंतर, स्पीड पोस्टसाठी 'अॅड-ऑन' सेवा मिळेल, म्हणजेच ग्राहक आपल्या मेलला ‘पत्ता-विशिष्ट’ किंवा ‘व्यक्ती-विशिष्ट’ बनवू शकतील.
या निर्णयामुळे स्पीड पोस्टच्या दरात कोणताही बदल होणार नाही, उलट स्थानिक स्तरावर ही सेवा अधिक किफायतशीर ठरणार आहे. सध्या रजिस्टर्ड पोस्टसाठी (२० ग्रॅमपर्यंत) स्थानिक दर रु. २२ आहे, तर स्पीड पोस्टसाठी (५० ग्रॅमपर्यंत) स्थानिक दर फक्त रु. १५ आहे. संपूर्ण भारतात लागू होणारा 'वन इंडिया वन रेट' स्पीड पोस्टसाठी रु. ३५ आहे (कर वगळता). कर्नाटकमधील उच्च न्यायालयानेही रजिस्टर्ड पोस्टऐवजी स्पीड पोस्टचा पर्याय स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
ही ऐतिहासिक सेवा बंद होणार असली तरी तिच्या सुरक्षिततेच्या वैशिष्ट्यांसह स्पीड पोस्टमध्ये समावेश केल्यामुळे ग्राहकांना अधिक सुविधा आणि विश्वासार्हता मिळणार आहे.
एका युगाचा अंत होतोय, पण एका नव्या युगाची सुरुवात होतेय. आज, आपण तंत्रज्ञानाच्या जगात आहोत. जिथे प्रत्येक गोष्ट जलद हवी आहे. पोस्ट ऑफिसही याच बदलाचा एक भाग होत आहे. रजिस्टर्ड पोस्टची जागा स्पीड पोस्ट घेईल.