मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून मिळणाऱ्या हफ्त्याची वाट पाहावी लागत असून १५०० रुपये बँक खात्यात कधी जमा होणार, याचीच वाट पाहिली जात आहे. आता, महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा रक्षाबंधन पूर्वसंध्येला हप्ता द्यायला सुरुवात होईल, अशी माहिती दिली. कालपासूनच पात्र लाभार्थ्यांना याचे वितरण सुरू झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे गतवर्षी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २ महिन्यांचा हफ्ता एकत्रितपणे दिल्याने महिलांना थेट ३ हजार रुपये मिळाले होते. मात्र, यंदा एकच हप्ता मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा बोगसपणे लाभ घेणाऱ्यावर कारवाई करण्यात येत असून माहिती व तंत्रज्ञान विभागाने काही डाटा आमच्याकडे दिला आहे. या डेटाची तपासणी करण्यासाठी आम्हाला पुढच्या १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानुसार, पुढील १५ दिवसांत बोगस लाभार्थ्यांचा आकडा समोर येणार आहे. जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तीने याचा लाभ घेतला असल्याचे समोर आल्यास त्याच्यावर कडक कारवाई होणार असल्याचेही आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे तटकरे यांनी कालच ट्विटरवर पोस्ट करत लाडकी बहिण योजनेच्या हप्त्यासंदर्भात माहिती दिली होती.