
ठाणे : उच्च न्यायालयाने पीओपी गणेशमूर्तींना परवानगी दिल्यामुळे पीओपी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र ६ फुटापर्यंतच्या पीओपी मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे निर्देश दिल्याने ठाणे महापालिका क्षेत्रात कृत्रिम तलाव वाढवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव ह्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्याचे निर्देश मंगळवारी दिले आहेत.
यावर्षी २४ कृत्रिम तलाव, ७४ टाकी विसर्जन व्यवस्था, १५ फिरत्या विसर्जन व्यवस्था, ९ घाट विसर्जन व्यवस्था व १० मूर्ती स्वीकृती केंद्र अशा एकूण १३२ ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या वतीने मंगळवारी सकाळी ठाण्यातील गणेश मंडळ, वाहतूक विभाग व पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक झाली. बैठकीस पालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी या उत्सवासंदर्भात प्रशासनाची कोणती मदत अपेक्षित आहे याविषयी भूमिका व्यक्त केली, तर पालिका प्रशासनाकडून काय तयारी करण्यात येणार आहे, याची माहिती गणेश मंडळांना दिली.
‘राज्य उत्सवाचा दर्जा मिळालेला गणेशोत्सव यंदाही उत्साहाने साजरा करूया. नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी बाप्पाच्या आशीवार्दाने उत्सव निर्विघ्नपणे साजरा करूया’, असे आवाहन आयुक्त राव यांनी केले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, मधुकर बोडके, दिनेश तायडे, सचिन सांगळे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांसह महापालिका, महावितरण, टोरँट पॉवर, स्वंयसेवी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.