सण आयलाय गो...

  33

उदय खोत


नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा जिव्हाळ्याचा सण. दरवर्षी दर्याराजाची पूजा करून नारळ अर्पण करून मासेमारीसाठी होड्या सोडल्या जातात. या होड्यांना कोळी बांधवांचे वादळवाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी कोळी भगिनी ‘आमच्या धन्याचे रक्षण कर, आमच्या बोटीवर मुबलक मासोळी गावू दे.’ असे गाऱ्हाणे घालून नारळी पौर्णिमेचा सण आनंदात साजरा करतात.


सण आयलाय गो... आयलाय गो... नारली पुनवचा... मनी आनंद... मावना कोळ्यांचे दूनियेचा... म्हणत आजच्या बदलत्या काळातही ग्रामीण भागात व कोळीवाड्यातील अबालवृद्धांना खराखुरा आनंद मिळवून देणारा सण म्हणजे नारळी पौर्णिमा होय! तसेच समुद्राला कोळी लोक प्रेमाने ‘दर्या’ म्हणतात. हा दर्या कोळी बांधवांच्या जगण्याशी इतका एकरूप झालेला असतो की त्याची बरीचशी लोकगीते देखील या दर्यावरच रचलेली आहेत.


दर्यावरी आमची डोले होरी
घेऊन माशांच्या ढोलीन्
आम्ही हाव जातीचे कोली...


दर्याच्या सान्निध्यात राहणाऱ्या कोळी बांधवांचे मन देखील समुद्रासारखे विशाल. दर्या जसा ओसंडून वाहत असतो, तसेच कोळी बांधवांच्या आयुष्यात आनंद, उत्साह ओसंडून वाहत असतो. दर्या आपला राजा आहे, तर कधी कधी अभिमानाने स्वत:लाच ‘दर्याचा राजा’ म्हणवून घेतो. हिंदू संस्कृतीतील व्रतवैकल्यांनी ठासून भरलेला श्रावण महिन्यातील एक महत्त्वाचा सण जो एकविसाव्या शतकातील बदलत्या संस्कृतीतही आपले वेगळेपण जपून आहे. विशेषत: आयुष्यभर ज्याच्या सान्निध्यात मच्छीमारी हाच एकमेव व्यवसाय करणाऱ्या व आपल्या संपूर्ण जीवनाची भिस्तच ज्याच्यावर अवलंबून आहे त्या सागराची मनोभावे पूजाअर्चा करून त्याला विधिवत नारळ अर्पण करून आपल्या नवीन हंगामाची सुरुवात समस्त कोळी बांधव याच पौर्णिमेच्या दिवशी करतात. म्हणूनच तिला ‘नारळी पौर्णिमा’ असे म्हटले जाते.


समुद्रकिनारी ज्या भागात नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. विशेषतः कोकण किनारपट्टीवरील गावागावांतून याच दिवशी ठिकठिकाणी नारळ फोडी स्पर्धा आयोजित केल्या जातात. खऱ्या अर्थाने सर्वधर्मसमभावाची जपणूक करणाऱ्या या स्पर्धांना कोकणात महत्त्वाचे स्थान आहे.


नारळ खेळणारे हौशी स्पर्धक मुंबईतील वसई-विरार या पट्ट्यासह, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यांतूनही खास खेळण्यासाठी वापरण्यात येणारे ‘खेळी’ नारळ हजारो रुपये खर्च करून विकत घेऊन येतात. अशा स्पर्धांसाठी आयोजक मोठ्या रकमेची बक्षिसेही ठेवतात. असे खेळी नारळ ज्या बागायतदारांच्या बागेत असतात त्यांनाही चांगले उत्पन्न त्यातून मिळते. या दिवशी नारळ खेळण्याच्या पारंपरिक प्रथेमुळेदेखील तिला ‘नारळी’ पौर्णिमा असे म्हटले जाते.


जून महिन्यात पावसाळी हंगामाला सुरुवात होते. मान्सूनचे आगमन जोरदार वारे, ढगांच्या गडगडाटांनी, विजांच्या लखलखाटाने होत असल्याने या काळात समुद्रालाही उधाण येते. हवामान बदलामुळे खवळलेल्या समुद्रात मासेमारी करणे धोक्याचे ठरते. हाच काळ समुद्रातील विविध प्रकारच्या माशांच्या प्रजननासाठी उपयुक्त काळ असतो. हा माशांचा प्रजननाचा काळ असल्याने राज्य सरकारने १५ ऑगस्ट हा मासेमारी बंदीचा कालावधी जाहीर केला आहे. यंदा नारळी पौर्णिमा आधी आल्याने रविवारपासून काही ठिकाणी पुन्हा मासेमारीला सुरुवात होईल. मासेमारी बंदीच्या काळात अनेक कोळी कुटुंब यात्रेला, देवदर्शनाला किंवा दोन-तीन महिन्यांसाठी आपापल्या गावी जातात. या काळात त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह जेमतेमच चालतो. नारळी पौर्णिमेला खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी सागराची विधिवत पूजा केली जाते, नारळ अर्पण केला जातो. समुद्राला नारळ अर्पण करून कोळी बांधव सागराला शांत होण्यासाठी व सुरू होणारा हंगाम चांगला जाऊ दे म्हणून मनोमन प्रार्थना करतात. त्यानंतरच आपल्या होड्या मासेमारीसाठी समुद्रात लोटतात. या दिवसापासूनच त्यांच्या मासेमारीच्या नव्या हंगामाचा श्रीगणेशा केला जातो. काळ बदलला तरी कोळी बांधवांनी ही परंपरा कायम ठेवली आहे.


नारळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी येथील कोळीवाड्यांतून मंगळागौरीचे आगमन होते. तिचे पूजन करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवल्यानंतर तिचे विसर्जनही याच दिवशी केले जाते. महिला एकाच रंगाच्या साड्या परिधान करतात, तर काही जण पारंपरिक वेशभूषा साकारतात. पुरुष मंडळीही नवीन रुमाल, विविध रंगांचे शर्ट, कुर्ते-पायजमा, तर काहीजण शर्टावर लाल रंगाची बंडी, डोक्यावर लाल-पिवळ्या रंगाची कानटोपी अशा पेहरावाने सजतात. सायंकाळी मंगळागौरीबरोबरच सोन्याचा नारळ ठेवलेला करा डोक्यावर घेऊन, केसात वेण्या, गजरे माळून अंगावर सोन्या-चांदीचे दागिने परिधान करून बेंजो, डिझेल, खालूबाजाच्या तालावर थिरकत मिरवणुकीने कोळी बांधव समुद्राकडे प्रस्थान करतात. या मिरवणुकीत जेव्हा अबालवृद्ध ठेका धरतात तेव्हा लहान-मोठेपणाची, गरीब-श्रीमंतीची व जातीपातीची सर्व बंधने गळून पडतात व अख्खा कोळीवाडा या आनंदात न्हाऊन निघतो. सागराची पूजा करून नारळ अर्पण केला जातो. खोल समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या आमच्या धन्याचे रक्षण कर, आमच्या बोटीवर मुबलक मासोळी गावू दे... असे गाऱ्हाणे कोळी भगिनी समुद्राला घालतात. समुद्राची पूजा केल्यावर रंगीबेरंगी पताका, झुली, हार-फुलांनी सजवलेल्या, रंगवलेल्या बोटी हळूहळू समुद्राच्या फेटाळलेल्या लाटांवर स्वार होतात. त्यावेळी मच्छीमारांच्या आनंदाला पारावार उरत नाही.


तसा मासेमारी हा व्यवसाय आता पूर्णपणे सतत बदलत्या लहरी हवामानावर अवलंबून असल्याने येथील कोळीवाड्यातील बरीच तरुण मुले, मुलीही आता अन्य नोकरीधंद्यानिमित्त शहराकडे वळू लागली असली, तरी सणानिमित्ताने आपापल्या घरी परतणारी तरुणाई आपली संस्कृती जपण्यासाठी धडपडत असतात. शहरीकरणाचा त्यांच्या वागणुकीवर परिणाम झाला असला तरी आपल्याच स्वतःच्या जुन्या कोळीवाड्यात त्यांना कुठेही कमीपणाची भावना वाटत नाही. म्हणूनच आजच्या एकविसाव्या शतकातही कोळीवाड्यातील नारळी पौर्णिमेच्या दिवशी निघणाऱ्या नारळाच्या मिरवणुकीत गुलाल, भंडारा उधळला जातो. तीच धमाल, मौजमजा मस्ती अनुभवायला मिळते आणि त्यातून भारतीय संस्कृतीचीही आपसूकच जपणूक होते.

Comments
Add Comment

ध्यास मराठीतून शिकण्याचा

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर मी १३ वीत असताना आमच्या कोकजे सरांनी नेरळ येथील वेगवेगळ्या शाळांची ओळख करून दिली.

हरवलेलं माणूसपण

मोरपीस: पूजा काळे स्वामी तुम्ही पाहताय ना! काळ सोकावलायं, माणसातील माणूसपण हरवत चाललयं! देवळाबाहेरच्या परिसरात

शेतकरी बांधवांना वरदान ठरणारी 'सब्जी कोठी'

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे रक्षाबंधन हा बहीण-भावांच्या नात्याचा उत्सव. भावाने बहिणीची रक्षा करावी म्हणून ती त्यास

हसरी शंभरी...

चारुहास पंडित : प्रसिद्ध व्यंगचित्रकार आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून शब्देवीण संवाद साधणारे ज्येष्ठ

सुखावणारा ऋतुगंध

तुझी माझी पहिली भेट म्हणजे मृद्गंधाचे अनमोल दरवळते अत्तर नाते तुझे नी माझे हृदयस्थ सुंदर बहरत राहते माझ्या मनी

सखी झाल्या उद्योजिका

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे मैत्री ही या जगातली एक सुंदर गोष्ट आहे. निखळ मैत्रीमुळे आयुष्य समृद्ध होतं. अशाच त्या