Tuesday, August 5, 2025

परिवर्तनाची नांदी

परिवर्तनाची नांदी

वार्तापत्र: मध्य महाराष्ट्र


पुणे आणि गणेशोत्सवाचे अतूट नाते आहे. किंबहुना सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवातच पुण्यनगरीतून झाल्याने पुण्यातील या महोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच पुण्यातील विसर्जन मिरवणूकही तेवढीच वैभवशाली असते. यंदापासून अखिल मंडई आणि भाऊरंगारी गणपती मंडळाने विसर्जन मिरवणुकीत मानाच्या पाच गणपतीनंतर सहभागी व्हायचा निर्णय घेतला आहे. याने मिरवणूक लवकर संपण्यास मदत होईल आणि पोलीस प्रशासनावरचा ताण कमी होईल. मिरवणूक लवकर संपेल असे म्हटले जात असले तरी तसे होईल का, हा प्रश्न आहे. मिरवणूक लवकर संपविण्याचे आव्हानही पोलिसांपुढे असणार आहे.


या वर्षी अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्या दिवशी ग्रहण आहे. त्यामुळे या मंडळांनी हा निर्णय घेतला. पण, दरवर्षीच आता ही मंडळे मिरवणुकीत लवकर सहभागी होणार आहेत. मानाच्या पाच गणपतीनंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई आणि भाऊरंगारी गणपती हे आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. या गणपतींचे रथ आणि रथावर असलेली विद्युत रोषणाई बघण्यासाठी गणेभक्त अलोट गर्दी करतात. या गणपतींचे विसर्जन झाल्यावर गणेशभक्तांची गर्दी ओसरायला लागते. पोलीस प्रशासनावरील ताणही कमी होतो. अनेक वर्षे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई आणि भाऊरंगारी गणपती ही मंडळे रात्री मिरवणुकीत सहभागी होतात.


यामुळे विसर्जन मिरवणूक लांबत जाते. या मंडळांपुढे ढोल-ताशा, पथके, बँड पथके यामुळे मिरवणूक लांबत जाते, असा आरोपही या मंडळांवर सातत्याने होत असतो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्याशिवाय मंडई आणि भाऊसाहेब रंगारी गणपतीला मिरवणुकीमध्ये सहभागी होत नाही. पण, गेल्या दोन वर्षांपासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीने मिरवणुकीत दुपारी ४ वाजता सहभागी होण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. दोन वर्षांपासून दगडूशेठ गणपती दुपारी ४ वाजता मिरवणुकीत सहभागी होत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन झाल्यावर गणेशभक्तांची गर्दी ओसरायला लागते, असेच चित्र गेली दोन वर्षे दिसून आले आहे. मंडई आणि भाऊरंगारी गणपती रात्री उशिरा मिरवणुकीमध्ये सहभागी होत असल्याने गणेभक्त जागेवरच दर्शन घेऊन भक्तांची पावले घराकडे वळतात. यावर्षी असलेले ग्रहण आणि गणेशभक्तांकरिता मंडई आणि भाऊसाहेब रंगारी मंडळाने घेतलेला निर्णय योग्य ठरतो की नाही हे पाहणे औत्स्युक्याचे ठरेल.


या मंडळांनी घेतलेला निर्णय जरी स्वागतार्ह असला तरी मानाच्या पाच गणपतीनंतर कामयानी शाळा, महापालिकेचा गणपती, त्वष्टा कासार असाच क्रम गेली अनेक वर्षे चालत आला आहे. त्यामुळे ही मंडळे काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. साधारणपणे पुण्यातील विसर्जन मिरवणूक ही २८ ते २९ तास चालते. मानाच्या पाच गणपतीनंतर ही मंडळे मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत. पण, यामुळे मिरवणूक खरंच लवकर संपेल का हा प्रश्न आहे. मात्र, पुण्याची मिरणवूक आजही देखाव्यानंतर गाजत असेल, तर तिच्या विक्रमी वेळेसाठीच. पुण्यात सार्वजनिक गणपतींमध्ये मानाच्या गणपतींना महत्त्वाचे स्थान आहे. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा यांचा यात समावेश होतो, तर मंडई, दगडुशेठ, जिलब्या मारुती यांचे महत्त्वही तितकेच आहे.


मानाच्या गणपतीमधील पथकांची संख्या तसेच त्यांच्यात पडणारे अंतर आणि वाढत जाणारा वेळ हा नेहमीच वादाचा आणि चर्चेचा मुद्दा राहिला आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वीच वेगळा पायंडा पाडत मानाच्या केसरीवाडा गणपतीने टिळक रस्त्याने मिरवणुकीत सामील होण्याचा निणर्य घेतला होता. मर्यादित पथके, पोलिसांच्या आक्रमक भूमिकेनंतर यात बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. यंदाही मिरणवूक लवकर संपविण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. पण, आता वेळेचा विचार करून हा निर्णय घेतला आहेच, तर कमी वेळात ही विसर्जन मिरवणूक पार पडते का, हे आता पाहावे लागेल.


अखिल मंडई आणि भाऊरंगारी गणपती मंडळाने मिरवणुकीत लवकर सहभागी होणार असे सांगितल्याने काही मंडळांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सकाळी ७ वाजता आम्ही मिरवणूक सुरू करू असे मंडळांनी सांगितल्याने पेच निर्माण झाला आहे.


- प्रतिनिधी

Comments
Add Comment