दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
रक्षाबंधन हा बहीण-भावांच्या नात्याचा उत्सव. भावाने बहिणीची रक्षा करावी म्हणून ती त्यास धागा बांधते ते बंधन म्हणजे रक्षाबंधन. मात्र आजच्या काळात ही बहीणदेखील सबला झाली आहे. अशीच बहीण-भावाची जोडी उद्योग क्षेत्रात क्रांती घडवत आहेत. त्यांनी तयार केलेल्या उत्पादनामुळे जगातील शेतकऱ्यांना प्रचंड फायदा होणार आहे. हे बहीण-भाऊ म्हणजे निक्की कुमार झा आणि रश्मी झा. सप्तकृषी सायंटिफिक प्रा. लि. हे यांच्या कंपनीचे नाव. या दोघांनी शोध लावलेल्या यंत्राचे नाव आहे सब्जीकोठी. ही सब्जीकोठी गरीब शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे.
बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील नया टोला दुधेला या गावात निक्की आणि त्याची बहीण रश्मीचा जन्म झाला. एका शेतकरी कुटुंबात वाढलेल्या या भावंडांनी उच्च शिक्षण घेतले. निक्कीने नालंदा विद्यापीठातून पर्यावरणशास्त्र आणि पर्यावरण विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली, तर रश्मी बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे. गावात वाढलेल्या या भावंडांनी शेतीचे मुबलक उत्पादन पाहिले पण त्यासोबतच तितकीच नासाडीदेखील पाहिली. सहसा, शेतकरी आपली जमीन प्रमुख पीक, फळे आणि भाज्या वाढवण्यासाठी विभागतो. ६० टक्के शेतजमिनीमध्ये मुख्य पीक घेतले जाते, तर ४०% जमिनीत फळे आणि भाज्यांची उत्पादने घेतली जातात. जी दररोज घरात वापरली जातात तर काही बाजारात विकली जातात. ही फळे आणि भाज्यांचे उत्पादन दररोज शेतकऱ्याच्या घराचा उदरनिर्वाह करते. निक्की आणि रश्मीला या फळे आणि भाज्यांची नासाडी पाहून वेदना होत असे. कापणीनंतर जास्त काळ उत्पादन ताजे ठेवणे खूप कठीण असते. हवामानामुळे, फळे आणि भाज्यांचे अर्धे उत्पादन दररोज बाजारात पोहोचेपर्यंत त्याचा ताजेपणा कमी झालेला असतो. निक्कीने त्याच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमादरम्यान या अर्थव्यवस्थेबद्दल आणि त्यामुळे ओढवणाऱ्या गरिबीबद्दल बरेच संशोधन केले. या संशोधनातून त्यांनी निर्माण केलेली एक अशी व्यवस्था ज्यामुळे भाज्या आणि फळे ताजी राहू शकतात. यास सब्जीकोठी असे नाव रश्मी आणि निक्कीने दिले. सब्जीकोठी हा शेतकऱ्यांना वैयक्तिकरीत्या किंवा मोठ्या प्रमाणात त्यांचे उत्पादन ३० दिवसांपर्यंत ताजे ठेवण्यास मदत करण्याचा एक प्रयत्न आहे. ज्यामुळे त्यांना ती उत्पादने वापरण्यासाठी किंवा विकण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
सुरुवातीला रश्मी आणि निक्कीने उत्पादन वाचवण्यासाठी शीतगृह यंत्रणा वापरून पाहिली, पण ती तितकीशी यशस्वी झाली नाही. आपल्याला पूर्णपणे नवीन दृष्टिकोनातून विचार करण्याची आवश्यकता आहे असे रश्मीने निक्कीला सांगितले. त्यानुसार त्यांनी पुन्हा नव्याने संशोधनास सुरुवात केली. बऱ्याच संशोधनानंतर, त्यांनी उत्पादनासाठी सूक्ष्म हवामान तयार करण्याची यंत्रणा विकसित केली. उच्च आर्द्रता, निर्जंतुकीकरण, कुजण्यापासून रोखले जाईल असे इलेक्ट्रॉनिक ऑक्सिडाइज्ड इथिलीन लहान घटकांमध्ये समाविष्ट केले. फक्त एक लिटर पाणी, २० वॅटचा इलेक्ट्रिक बल्ब आणि एक वेगळा कक्ष, शक्यतो तंबू इत्यादी गोष्टी आवश्यक आहे. ते एका रेग्युलेटरसह लावण्यात येते जे साठवलेल्या पिकांवर अवलंबून स्टोरेज डिव्हाइसमधील सूक्ष्म पर्यावरण बदलू शकते. त्यांनी मिश्र सूक्ष्म वातावरणासाठीदेखील समायोजन केले आहे, जिथे शेतकरी ताजी फळे आणि भाज्या साठवून ठेवू शकतात. सर्व उत्पादनांचे शेल्फ लाइफसारखे नसेल. ते फळे आणि भाज्यांसाठी विशिष्ट असेल.
सब्जीकोठीची २०० किलो, ५०० किलो आणि १,००० किलोपर्यंत साठवण क्षमता आहे. त्यांची किंमत अनुक्रमे १०,००० रुपये, २०,००० रुपये आणि ४०,००० रुपये आहे. सब्जीकोठीने एका युनिटमध्ये साठवणूक आणि वाहतूक उपाय समाविष्ट करण्याची अभिनव कल्पना आणली आहे. त्याचबरोबर इथिलीन-डिग्रेडेशनचा वापर जतन करण्याचे तंत्र म्हणून केला आहे.
सब्जीकोठी हा जागतिक स्तरावर अशा प्रकारचा एकमेव प्रकल्प आहे. हे भारतीय कृषी व्यवस्थेसाठी अतिशय विशिष्ट आहे. काही देशांनी हे लक्षात घेऊन रश्मी आणि निक्कीसोबत संपर्क साधला आहे. या दोघांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हे उत्पादन राज्य सरकारकडे पाठवले आहे.
ज्यांना शीतगृह परवडणार नाही अशा शेतकऱ्यांना सब्जीकोठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. शीतगृहाच्या तुलनेत ते स्वस्त आहे. त्याचप्रमाणे अगदी हातगाडीवर सुद्धा ते उभारता येते. सप्तकृषी सायंटिफिक प्रा. लि. या नावाने रश्मी आणि निक्की यांनी आपली कंपनी सुरू केली आहे. याअंतर्गत ते सब्जीकोठीचे वितरण करतात. एका वेबसाईटनुसार या कंपनीची उलाढाल ही काही कोटी रुपयांमध्ये आहे. बहीण-भाऊ जर एकत्र आले तर ते किती उच्च दर्जाचे कार्य करू शकतात हे निक्की आणि रश्मीने सिद्ध केले आहे. सर्वार्थाने ही आदर्शवादी भावंडे आहेत.