
राहुल गांधी यांनी २८ मार्च २०१८ रोजी एका सार्वजनिक भाषणादरम्यान भाजपचे त्यावेळचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात टिप्पणी केली होती. या टिप्पणी प्रकरणी भाजप नेते प्रताप कुमार यांनी जुलै २०१८ मध्ये झारखंडच्या चाईबासा सीजेएम कोर्टात राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीला राहुल गांधी गैरहजर होते. अखेर न्यायालयाने राहुल गांधी यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढले.
चाईबासा न्यायालयाने जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी राहुल गांधी यांनी झारखंड उच्च न्यायालयात दाद मागितली. झारखंड उच्च न्यायालयाने राहुल गांधींना ६ ऑगस्ट रोजी चाईबासा न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. या निर्देशांचे पालन करत राहुल गांधी बुधवार ६ ऑगस्ट २०२५ रोजी झारखंडमधील चाईबासा येथील विशेष खासदार-आमदार न्यायालयात हजर झाले. यानंतर खटल्यात सहकार्य करण्याच्या अटीवर न्यायालयाने राहुल गांधींना जामीन दिला.