
मुंबई (वार्ताहर) :सध्या सणांचा काळ सुरु झाल्यामुळे डाळी तसेच नारळाचा वापर धार्मिक विधी आणि नैवेद्य दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र अशातच आता नारळासह डाळींचे देखील दर वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे.
यंदा खरिपाच्या पेरण्यांमध्ये डाळींच्या पेरणी क्षेत्रात घट झाली आहे. त्यामुळे श्रावण महिना आणि सणासुदीच्या हंगामात डाळी महागणार आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सांख्यिकी विभागाकडील आकडेवारीनुसार, यंदाच्या खरिपात सर्व प्रकारच्या डाळींच्या पेरणी क्षेत्रात सरासरी ०.३१ टक्क्यांची घट झाली आहे. त्यातील सर्वाधिक ६.६८ टक्क्यांची घट तुरीत आहे. मसुरीच्या पेरणी क्षेत्रातही ४.७९ टक्क्यांची मोठी घट आहे.
मुगाच्या पेरणी क्षेत्रात ३.३९ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे काहीसा दिलासा आहे. हरभरा वगळता, सर्व प्रकारच्या डाळींचे नवे पीक पावसाळ्यानंतर बाजारात येते. मात्र पावसाळ्यात पेरण्या कमी-अधिक झाल्यास, पीक बाजारात येण्याआधीच दरांमध्ये चढ-उतार होतात. यंदा पेरणी क्षेत्रात घट झाल्याने पीक घटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच बाजारात डाळींचे दर वाढण्याची शक्यता आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
मुंबईच्या किरकोळ बाजारात तूरडाळ ११० रुपये किलो, मुगडाळ १२० ते १२५ रुपये किलो, तर उडदाची डाळ १४० ते १५० रुपये किलोवर स्थिर आहे. खाद्यतेलाचा विचार केल्यास सोयाबीन तेल ११५, सूर्यफूल तेल १३० व शेंगदाणा तेल १७० रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.
खाद्यतेलाचे दर नियंत्रणात
भारत हा जगातील सर्वांत मोठा खाद्यतेल वापरकर्ता व आयातदार देश आहे. भारतात इंडोनेशिया व मलेशियातून पामतेलाची, तर रशिया, युक्रेनहून सूर्यफूल तेलाची आयात होते. अर्जेंटिनाहूनही सूर्यफूल तेलाची आयात होते. यंदा रशियाने अलिकडेच सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात घट केली. या पावलावर पाऊल ठेवून अर्जेटिनानेही दरकपात केली. त्यामुळे सध्या तरी खाद्यतेल दर नियंत्रणात आहेत. हीच स्थिती आगामी सणासुदीच्या काळात असेल, अशी आशा अ. भा. खाद्यतेल महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी व्यक्त केली.
नारळाच्या किमतीतही वाढ : श्रावण महिन्यात नारळाची मागणी वाढली आहे, ज्यामुळे किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर दक्षिण भारतातून येणारा पुरवठा घटल्याने बाजारात नारळाचे दर चढले आहेत. पूर्वी २५ ते ३५ रुपयांत मिळणारा नारळ सध्या ४० ते ५० रुपयांना विकला जात असून, ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. मुंबई, नवी मुंबई परिसरात आता नारळाला मागणी वाढली आहे. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूसारख्या प्रमुख नारळ उत्पादक राज्यांत यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. तर काही भागांत अवकाळी पावसामुळे आणि कीड लागवडीमुळे उत्पादनही घटले. त्यामुळे महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये नारळाचा पुरवठा घटला आहे. पुरवठा आणि मागणी यामधील असमतोलामुळे दर वाढले आहेत, अशी माहिती वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी दिली.