
प्रभाग रचना जुन्याच पद्धतीने, पण घातली विकास आराखड्याची सांगड
मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरता सध्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचनेचे काम सुरू आहे. या सुधारित प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा बनवण्यात आला असून त्यावर महापालिका आयुक्त आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी रात्री उशिरापर्यंत झाल्यानंतर प्रारूप आराखडा नगरविकास खात्याकडे मंगळवारी सायंकाळी सादर करण्यात आला.
यामध्ये २२७ प्रभागाचा आराखडा बनवताना त्याला २०१४-३४ विकास आराखड्याची सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रभागाचे क्षेत्रफळ वाढले जाणार आहे, पण त्यात लोकसंख्या वाढली जाण्याची शक्यता कमी दिसून येत आहे. त्यामुळे प्रभाग रचना झाली तरी त्याचा परिणाम निवडणूक आणि पर्यायाने मतदानावर होणार नसल्याची माहिती मिळत आहे.
पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात प्राप्त झालेल्या प्रचाग रचना २०२५ च्या संदर्भातील सर्व अधिकारी महापालिका आयुक्तांना प्रदान करण्यात आली. निवडणुकीकरता प्रभाग रचना ही शासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने करावयाची आहे असे नमूद केले. मुंबईतील २२७ प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना तयार करून निवडणूक आयोगाची मान्यता पालिका आयुक्त घेतील आणि या प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयुक्त हे मान्यता देणार आहेत.
सन २०११च्या जनगणनेनुसार महापालिका हद्दीतील प्रगणक एकूण लोकसंख्या, अनुसूचित जातीची,जमातीची लोकसंख्या, प्रगणक गटाचे नकाशे आणि घरयादी ही जनगणना कार्यालयाकडून उपलब्ध करून केली जाणार आहे. पण प्रभागातील मतदार संख्या अथवा सध्याची रहिवाशांची संख्या विचारात घेता येणार नसून याचा प्रभाग रचनेशी कसलाही संबंध नसेल असेही नमुद केले आहे. प्रभागाची लोकसंख्या ही त्या प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या १० टक्के जास्त किंवा १० टक्के कमी अशाप्रकारे मर्यादीत ठेवत रचना करता येणार आहे, असे सांगण्यात येत होते.
परंतु या प्रभाग रचनेत महापालिकेने २०१४ चा विकास आराखडा विचारात घेतला असल्याची माहिती मिळत आहे. २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी प्रारूप विकास आराखडा. तयार करण्यात आला होता आणि सन २०१८मध्ये याला अंतिम मान्यता मिळाली.
त्यामुळे मुंबईच्या प्रभागाची रचना २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे विकास आराखडा विचारात घेऊन त्यानुसार प्रभागांच्या सीमा निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये मुंबईच्या चारही बाजूंनी असलेल्या सीमा मग त्या इतर महापालिकांच्या हद्दीत पूर्वी असतील किंवा समुद्र आणि खारफुटीचा भाग असेल यांचा मुंबईच्या
हद्दीत येणारा भाग प्रभाग रचनेत ग्राह्य धरला गेला आहे.