
हैदराबाद : इंग्लंडमधील जबरदस्त प्रदर्शनानंतर स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज बुधवार(दि.६) रोजी हैदराबादमध्ये परतले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले आणि त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. ओव्हल टेस्टमध्ये 9 विकेट्स घेण्यासाठी सिराजला “प्लेयर ऑफ द सीरीज” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. संपूर्ण मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू म्हणून त्यांनी एकूण 23 फलंदाजांना बाद केले होते.
सिराज प्रथम मुंबई विमानतळावर लँड झाले होते, त्यानंतर त्यांनी हैदराबादसाठी फ्लाइट पकडली. मुंबई विमानतळावर त्यांना भारतीय फील्डिंग कोच टी दिलीप यांच्यासोबत पाहण्यात आले होते. जेव्हा ते हैदराबादमध्ये पोहोचले, तेव्हा आधीपासूनच विमानतळावर त्यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते.
सिराजने चाहत्यांशी फारसं संवाद साधला नाही आणि ना फोटो काढले, पण चाहत्यांमध्ये त्यांच्याबद्दल असलेलं वेड स्पष्टपणे दिसून येत होतं. सिराज काळ्या ड्रेसमध्ये आणि गॉगल्स घालून खूप स्मार्ट दिसत होते. ते हैदराबाद विमानतळाबाहेर आले आणि फोनवर बोलत-बोलत थेट कारमध्ये जाऊन बसले. अनेक चाहत्यांनी त्यांना जोरदार चीयर केलं.
हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (एचसीए) च्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, अद्याप सिराजशी थेट संवाद झालेला नाही, पण त्यांच्या सन्मानार्थ एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो.