Wednesday, August 6, 2025

माधुरी लवकरच कोल्हापूरला परतणार!

माधुरी लवकरच कोल्हापूरला परतणार!

कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश; माधुरीला परत पाठवण्याबाबत वनताराकडून आश्वासन


कोल्हापूर: कोल्हापूरकरांच्या आंदोलनासमोर अखेर 'वनतारा' झुकले आहे. नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला लवकरच कोल्हापुरात परत आणण्यासाठी मदत करणार असल्याचे आश्वासन 'वनतारा'च्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यापासून ते नांदणी मठात पुनर्वसन केंद्र उभारण्यापर्यंत सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.



माधुरीला परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न


नांदणी मठाचे मठाधिपती आणि 'वनतारा'चे सीईओ विहान करनी यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत विहान करनी यांनी सांगितले की, "सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माधुरीला 'वनतारा'मध्ये नेण्यात आले होते, पण कोल्हापूरकरांच्या भावनांचा आम्ही आदर करतो. कोल्हापूरकरांच्या भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता."


करनी पुढे म्हणाले की, "यामध्ये कोणाचाही विजय किंवा पराजय नाही, हा माधुरी हत्तीणीचा विजय आहे. 'वनतारा'मध्ये तिला चांगल्या सुविधा मिळत आहेत आणि आता नांदणी मठातही तिला उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करू."



पुनर्वसन केंद्र उभारण्यास मदत


'वनतारा'च्या वतीने माधुरीसाठी नांदणी मठात एक पुनर्वसन केंद्र उभारण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, माधुरीला परत आणण्यासाठी 'वनतारा', राज्य सरकार आणि नांदणी मठ यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल. आवश्यक तो सर्व पत्रव्यवहार आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.



काय आहे प्रकरण?


गेल्या ३० वर्षांपासून नांदणी मठात असलेली माधुरी हत्तीण तिच्या हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत 'पेटा' (PETA) या संस्थेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर २८ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने माधुरीला गुजरातमधील अनंत अंबानी यांच्या 'वनतारा'मध्ये पाठवण्याचा आदेश दिला. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यात मोठा रोष निर्माण झाला. 'जिओ' सिमकार्डवर बहिष्कार घालण्यापासून ते भव्य पदयात्रा काढण्यापर्यंत अनेक आंदोलने झाली. राज्य सरकारनेही यात हस्तक्षेप करत माधुरीला परत आणण्यासाठी पावले उचलली. कोल्हापूरकरांच्या याच एकजुटीमुळे 'वनतारा'ने आता माघार घेतल्याचे दिसत आहे. लवकरच माधुरी तिच्या मूळ ठिकाणी परत येईल, अशी आशा आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा