मोरपीस: पूजा काळे
स्वामी तुम्ही पाहताय ना! काळ सोकावलायं, माणसातील माणूसपण हरवत चाललयं! देवळाबाहेरच्या परिसरात बसलेल्यांपैकी कोण्या एका दरिद्रीनारायणाचे बोल ऐकून आश्चर्य न वाटलं तर नवल होतं. सामान्यतः भीक मागणाऱ्यांची संख्या विचार करायला लावणारी. दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांपैकी, देवळाबाहेर, ट्राफिक सिग्नलपाशी भीक मागणाऱ्या दरिद्री नारायणाचे भिक्षापात्र आजन्म रिकामी राहते ते यासाठीचं. पोटाची खळगी, पेटलेला भुकेचा डोंब परमेश्वरालाही जाब विचारल्याशिवाय राहत नाही. दिसामाजी पदरात पडलेलं, एकेका दिसालाही पुरेल की नाही याची शाश्वती कमीचं. मिळवलेल्या अल्प जिन्नसावर, मिळकतीवर कुणा हरामखोराने डल्ला मारावा तर हा विषय जास्तचं त्रासदायक. खरं म्हणजे ज्याच्या त्याच्या ताटातलं खाणारे आपण कोण? एवढीही माणुसकी शाबूत राहिलेली नाही. विवंचनेत पडलेल्या नारायणाची बेचैनी माझं मन मात्र पोखरत गेली. वैयक्तिक स्वार्थाकरिता मनुष्याने सत्याचे केलेले विकृतीकरण हे समाजमन ढासळवणारे आहे. स्वार्थाचा, वासनांचा, अहंकाराचा आणि सुखोपभोगाचा होम पेटला तेव्हा मी नारायणात स्वातंत्र्याचा अंगार फुललेला पाहिला. नि:स्वार्थीपणे चांगल्या सत्कार्यासाठी भीक मागायची लाज का? विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे देवळाबाहेरच्या रस्त्यापासून सुरू झालेला माणूसकीचा सामाजिक अध्याय घरादारापर्यत पोहोचला तरी अनभिज्ञ आहोत आपण. माणूसपण हरवल्याची उदाहरणं आसपास घडतात तेव्हा ती बघण्यापलीकडे आपल्या हाती काही उरत नाही. कारण तो विषय आपल्या घरातला नसतो; परंतु कधीकाळी आपल्या बाबतीत या घटना घडल्या तर मात्र आपले डोळे ताडकन उघडतात. समाजघातक, लाजिरवाणा ठरलेला, विनाशाकडे नेणारा हा मार्ग मानवी संबंधावर भाष्य करणारा आहे.
स्वत:ला प्रामाणिक माणूस बनवा म्हणजे एक लबाड माणूस त्वरित कमी होईल असं थोर विचारवंत थॉमस कालाईल सांगून गेलेत. मनुष्याचा मोठेपणा आपापले काम प्रामाणिकपणे करण्यात आहे. ध्येयसिद्धीचा खरा पाया आणि साधन म्हणजे प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणे कर्तव्य, कर्म करत राहणं याला जो देवपूजा मानतो, त्याला लबाडीत मिळणारा आनंद अशक्य असतो. प्रामाणिकपणा अस्तित्वातचं नसेल तर त्याला जन्माला घातला पाहिजे. माणूसपण मिळविण्याचा तो एक वैभवशाली मार्ग असू शकेल. प्रामाणिकपणा, कृतज्ञता हे आपण समाजाचं देणं लागतो. भावना आणि आशावाद या कशातही न गुरफटलेले मूल्यमापन म्हणजे प्रामाणिकपणा होय; परंतु थॉमस यांच्या मते प्रामाणिकपणाचा मापदंड विसाव्या शतकापासून ढासळलेला दिसतो. विषयाचा दोन्ही बाजूने विचार करता प्रथम माणूसकी जपणारी माणसं विचारात घ्यायला हवीत. अशी माणसं लाखात एक असतात, जी हिऱ्याप्रमाणे चमकतात. तरी माणूसपण हरवल्याची दखलपात्र उदाहरणं आपल्या अवतीभवती सर्रास दिसून येतात. यामध्ये विवेकनिष्ठ दुर्गतीचा रस्ता मोठा असतो. याला बरीच कारणं आहेत. जागतिकीकरणाच्या बदललेल्या व्याख्या, यांत्रिकीकरण, सत्तालोलुपता. भरीस भर म्हणून लोकसंख्यावाढ, सुख, युद्ध, बेकारी, उपासमार या गोष्टी मानवाला बदल करण्यास भाग पाडत आहेत. कोण्याकाळी मनुष्याची श्रीमंती म्हणजे त्याचं उत्तम चारित्र्य होत. पण आजचं चित्र वेगळं आहे.
नव्या जमान्यातील बदललेले वारे, हव्यास, धनलालसा, नेहमीच दिसत असलेले दुसऱ्याचे दोष, कामाची निष्क्रियता यात आपण गुंतत चाललो आहोत. जे आहे ते माझं अन् माझ्यापुरताचं असं मानून सदसद्विवेकबुद्धीचा ऱ्हास करून घेतलेले आपल्यासारखे आपण पुढच्या पिढीला वाईट विचारांच्या पोथी सुपूर्त करत आहोत. एखाद्या नात्यामध्ये निर्माण झालेली तेढ, अहंकार, भौतिक सोयी सुविधांचा हव्यास, सुखलोलुपतेची चटक, कोटी कोटी हातांच्या मुठीत म्हटल तर सगळं आहे. आपल्या जीवनाचं सार सांगणारी ही मूठ ढिली पडली, तर नाती नुसती चव्हाट्यावर येणार नाहीत, तर भावनिक विध्वंसास कारणीभूत ठरतील. अंत:करणातील नम्रता विसरल्याने डोळे असूनसुद्धा आपणास अंधत्व आले आहे. आपल्या मनाला इतरांचा विचार शिवत नाही. मदतीचा हात पुढे येत नाही कुणास. वाईट गोष्टींच्या आहारी गेलेला महत्त्वाकांक्षेचा राक्षस आपल्या डोक्यावर नाचतोय. यायोगे कर्म, धर्म, गीतासार, संस्कार, आचार, विचार मागे पडत चालले आहेत. अवजड यंत्रापेक्षा मानवीय भाव भावनांचा सहज स्पर्श माणुसकीला बांधून ठेऊ शकतो हे सत्य स्वीकारलं नाही, तर कुणी कुणाचं उरणार नाही असं भयंकर वादळ दाराशी घोंघावेल, ज्यायोगे मानव जातीला पुढे जाऊन भयंकर परिणामांना तोंड द्यावे लागेल.