Wednesday, August 6, 2025

PM Modi on Kartavya Bhavan: "कर्तव्य भवनमुळे १५०० कोटी रुपये भाडे वाचेल", उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी दिली माहिती

PM Modi on Kartavya Bhavan:

कर्तव्य भवनातून पंतप्रधान मोदींचे भाषण


नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील कर्तव्य पथवर उभारण्यात आलेल्या कर्तव्य भवन ३ चे आज सकाळी उद्घाटन करण्यात आले. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत ही पहिली कॉमन सेंट्रल सेक्रेटरीएट इमारत आहे. या इमारतीच्या उद्घाटनानंतर जनतेला संबोधित करताना पंतप्रधानांनी कर्तव्य भवन- ३ बांधण्याचे कारण सांगितले. अनेक मंत्रालयांसाठी उभारण्यात आलेल्या या इमारतीमुळे १५०० कोटी रुपये वाचल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  


कर्तव्य भवनमधून जनतेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, "अमृतकालमध्ये, विकसित भारताची धोरणे या इमारतींमध्ये आखले जातील, निर्णय घेतले जातील आणि येत्या काही दशकांमध्ये देशाची दिशा येथूनच ठरवली जाईल." 


सेंट्रल व्हिस्टाच्या कर्तव्य मार्गावर नव्याने बांधलेल्या कर्तव्य भवनाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी जनतेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, "यापूर्वी, वेगवेगळ्या मंत्रालयांच्या भाड्यावर १५०० कोटी रुपये खर्च केले जात होते. या फक्त काही नवीन इमारती आणि सामान्य पायाभूत सुविधा नाहीत. तर अमृतकालमध्ये, विकसित भारताची धोरणे या इमारतींमध्ये आखली जातील, त्यावर निर्णय घेतले जातील आणि येत्या काही दशकांमध्ये देशाची दिशा येथूनच ठरवली जाईल. कर्तव्य पथ भवनासाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. या व्यासपीठावरून मी त्याच्या बांधकामाशी संबंधित सर्व अभियंते आणि कामगारांचे आभार मानतो."



कर्तव्य पथ का बांधले?


कर्तव्य पथ का बांधले याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी म्हंटले,  "स्वातंत्र्यानंतर, देशाची प्रशासकीय यंत्रणा अनेक दशके ब्रिटिश काळात बांधलेल्या इमारतींमध्ये चालत राहिली. या जुन्या प्रशासकीय इमारतींमधील कामाची स्थिती खूपच खराब होती, जिथे जागेचा अभाव, प्रकाशाचा अभाव आणि कामगारांसाठी वायुवीजनाचादेखील अभाव होता." ते पुढे म्हणाले की, ही इमारत आधुनिक पायाभूत सुविधेने सुसज्ज असून, पूर्वीपेक्षा अधिक मोठी जागा येथे आहे. तसेच या इमारतीला सौरउर्जेद्वारे वीजपुरवठा केल्याचे देखील त्यांनी सांगितले. याबद्दल ते म्हणाले, "कर्तव्य भवनासारख्या आधुनिक पायाभूत सुविधा केवळ लोक-केंद्रित भावनाच प्रतिबिंबित करत नाहीत तर त्या ग्रह-केंद्रित देखील आहेत. अक्षय ऊर्जेचा वापर करण्यासाठी या इमारतीच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यात आले आहेत आणि त्याच्या डिझाइनमध्ये प्रगत कचरा व्यवस्थापन प्रणालींचा समावेश करण्यात आला आहे. आज, देशभरात शाश्वत, ग्रीन बिल्डिंग  बांधण्याचा दृष्टिकोन वेगाने वाढत आहे."



 'हे कर्तव्य आहे...'  


कर्तव्य भवन बद्दल बोलताना मोदी पुढे म्हणाले, "आम्ही खूप विचारमंथनानंतर या इमारतीला कार्तव्य भवन असे नाव दिले आहे. कर्तव्य पथवरील कर्तव्य भवन आपल्या लोकशाहीचा मूळ आत्मा, आपल्या संविधानाचा प्रचार करते. "'कर्तव्य' हे केवळ एका इमारतीचे नाव नाही, तर कोट्यवधी देशवासीयांची स्वप्ने सत्यात उतरवण्याची ती तपोभूमी आहे. कर्तव्य ही सुरुवात आहे, कर्तव्य म्हणजे नियती आहे. करुणा आणि कृतीच्या स्नेहाच्या बंधनात बांधलेले कर्म... हे कर्तव्य आहे." ते पुढे म्हणाले, "आमचे सरकार एका समग्र दृष्टिकोनासह भारताच्या पुनर्बांधणीत गुंतले आहे. हे पहिलेच कर्तव्य भवन आहे जे पूर्ण झाले आहे, अशा अनेक कर्तव्य भवनांचे बांधकाम वेगाने सुरू आहे. आज देशाचा कोणताही भाग विकासाच्या प्रवाहापासून वेगळा नाही.


 

 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा