Wednesday, August 6, 2025

Dadar Kabutar Khana : प्रार्थना संपली... आता प्रतिकार! कबुतरखान्यावर जैन समाज संतप्त, पोलिसांसोबत बाचाबाची

Dadar Kabutar Khana : प्रार्थना संपली... आता प्रतिकार! कबुतरखान्यावर जैन समाज संतप्त, पोलिसांसोबत बाचाबाची

मुंबई : मुंबईतील कबूतरखाना परिसर पुन्हा एकदा तणावाच्या वातावरणात सापडला आहे. जैन समाजाने यापूर्वी जाहीर केलेले आंदोलन स्थगित केल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात मोठ्या संख्येने जैन समाजाचे नागरिक कबूतरखाना परिसरात दाखल झाले असून त्यांनी महापालिकेने बसवलेल्या ताडपत्रींवर आक्षेप घेत कारवाई सुरू केली आहे. सदरील परिसरात काही महिला थेट कबूतरखान्यात उतरल्या असून, ताडपत्री हटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लावलेल्या तात्पुरत्या संरचनेवर नागरिकांनी थेट आक्रमण केल्याचं चित्र समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आणि आंदोलकांमध्ये चांगलीच झटापट झाली आहे. पोलिसांनी आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, काही आंदोलक आक्रमक होत बाचाबाची सुरू झाली आहे. सध्या घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे.



जैन समाजाचा संताप उफाळला


मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेकडून हा कबूतरखाना बंद करण्यात आला होता. बंदीनंतरही काही नागरिक कबूतरांना धान्य टाकत असल्याचं समोर आल्यानंतर कोर्टाने संताप व्यक्त केला. त्यानंतर संबंधित व्यक्तींवर कारवाईचे आदेशही देण्यात आले. या पार्श्वभूमीवर महापालिकेने तातडीने कारवाई करत कबूतरखान्यावर ताडपत्री टाकली, जेणेकरून ना लोक तिथे धान्य टाकू शकतील, ना कबूतर तिथे बसू शकतील. मात्र, ही कारवाई जैन समाजाच्या रोषाला कारणीभूत ठरली. सुरुवातीला त्यांनी केवळ प्रार्थना सभेचं आयोजन असल्याचं सांगितलं होतं, आणि आंदोलन रद्द करण्यात आलं असल्याचंही जाहीर केलं. परंतु प्रत्यक्षात आज सकाळी, जैन समाजाचे शेकडो लोक कबूतरखाना परिसरात एकत्र जमले आणि त्यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट ताडपत्री फाडून टाकली. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून महापालिका आणि पोलीस यंत्रणेला या प्रकाराचा सामना करावा लागत आहे.






 










View this post on Instagram























 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)





महिलांचा सहभाग, ताडपत्री काढत आंदोलक आक्रमक


दादरमधील कबूतरखान्यावर आज सकाळपासून वातावरण तणावपूर्ण आहे. जैन समाजाच्या नागरिकांनी आक्रमकतेने कबूतरखाना परिसरात प्रवेश केला असून, या वेळी महिलांचाही मोठा सहभाग दिसून आला. आंदोलक महिला थेट कबूतरखान्याच्या आत उतरल्या आणि महापालिकेने टाकलेली ताडपत्री काढून टाकली. या कारवाईनंतर पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. जैन समाजाचे भावनिक वातावरण अधिक तीव्र होत चालले असून आंदोलक मागे हटण्याच्या मन:स्थितीत नाहीत. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस दलाने तात्काळ बंदोबस्त वाढवला आहे. सध्या परिसरात आंदोलकांना हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आधीपासूनच मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असला तरी, दादर परिसरात गोंधळाचे आणि अस्थिरतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.



नियंत्रित खाद्यपुरवठ्याचे आदेश


दादरमधील कबूतरखाना परिसरात कबूतरांना खाद्य टाकण्यावर निर्बंध लावण्यात आल्यानंतर सुरू झालेला वाद चिघळताना पाहायला मिळतोय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेत नियंत्रित पद्धतीने खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. हा निर्णय पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा