मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस रेल्वेत गोळीबार आणि हत्या प्रकरणात बडतर्फ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी याच्याविरोधातील खटल्याची सुनावणी मागील पाच महिने स्थगित होती. ही सुनावणी आता पुन्हा सुरू झाली आहे. चौधरीचा सहकारी नरेंद्र परमार याची साक्ष नोंदवण्यात आली.
चौधरीवर ३१ जुलै २०२३ रोजी पहाटे या गाडीत सेवेवर असताना सर्व्हिस रायफलमधून गोळीबार करून वरिष्ठ सहकारी (सहायक उपनिरीक्षक) टिकाराम मीना यांना तसेच तीन प्रवाशांना ठार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयात खटला सुरू झाल्यानंतर, आपण मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त नसल्याचा दावा चौधरीने वकिलांमार्फत केला होता. या प्रकरणी वैद्यकीय अहवाल आला आहे. चौधरी हा मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर बडतर्फ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी याच्याविरोधातील खटल्याची सुनावणी पुन्हा सुरू झाली आहे. घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेले आरपीएफचे बडतर्फ हेड कॉन्स्टेबल नरेंद्र परमार यांची सहावे साक्षीदार म्हणून साक्ष नोंदवण्यात आली.
जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसच्या एस सहा या डब्यात चौधरीने गोळीबार केला. तो कोणत्या तरी कारणामुळे चिडलेला दिसत होता. त्यावेळी त्याला थांबवावे असे वाटले होते. मात्र तसा प्रयत्न केला तर तो आणखी प्रवाशांवर गोळीबार करेल, अशी भीती वाटत होती; असे आरपीएफचे बडतर्फ हेड कॉन्स्टेबल नरेंद्र परमार यांनी सांगतले.